ठाण्यात ज्वेलर्सचे दुकान फोडून ३० लाखांचा ऐवज चोरीला
By Admin | Updated: May 9, 2014 22:40 IST2014-05-09T21:13:28+5:302014-05-09T22:40:40+5:30
परिसरातील राज गोल्ड ज्वेलर्सचे दुकान फोडून ७०० ग्रॅम सोन्याचे आणि १२ किलो चांदी असा सुमारे ३० लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला.

ठाण्यात ज्वेलर्सचे दुकान फोडून ३० लाखांचा ऐवज चोरीला
ठाणे- डोंबिवलीत राजरत्न ज्वेलर्स दुकान फोडल्यानंतर खबरदारी म्हणून सुरक्षितेच्या संदर्भात शहर पोलिसांनी दोन हजार ज्वेलर्स दुकानदारांची घेतलेल्या बैठकीस आठ दिवस होत नाही तोच चोरट्यांनी समतानगर परिसरातील राज गोल्ड ज्वेलर्सचे दुकान फोडून ७०० ग्रॅम सोन्याचे आणि १२ किलो चांदी असा सुमारे ३० लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला. ही घटना गुरूवारी मध्यरात्री घडली. विशेष म्हणजे दुकानात लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेर्यांची लपवून ठेवलेल्या बॅकअपची हार्डडीस्कही चोरून पोलिसांना चोरट्यांनी एकप्रकारे आव्हान दिले आहे.
समतानगर परिसरात राहणारे संदेश जैन यांचे त्याच परिसरातील देवदया पार्कमध्ये राज गोल्ड हे ज्वेलर्सचे दुकान आहे. त्याच्या ग्रील आणि शटरचे चार लॉक उचकटून दुकानात प्रवेश करून बनावट दागिने आणि जर्मन सिल्व्हरचा ऐवज सोडून तिजोरीतील ७०० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १२ किलो चांदीचा ऐवज चोरून नेला आहे. दुकानात ठिकठिकाणी सीसीटिव्ही लावलेले असल्याने चोरट्यांनी त्याचा बॅकअपही जाताना नेला आहे.जैन हे त्यांची आजारी आईला पाहण्यासाठी रुग्णालयात जाण्यासाठी गुरुवारी रात्री पार्टनरला सांगून लवकर निघाले. याचदरम्यान पार्टनर नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेला होता. याचदरम्यान रुग्णालयातून घरी जाण्यापूर्वी त्यांनी दुकानाच्या परिसरात एक फेरीही मारली. शुक्रवारी सकाळी ते दुकान उघडण्यासाठी आल्यावर हा दरोड्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. तसेच दुकानात सुरक्षितेच्या दृष्टीने चार सीसीटिव्ही कॅमेर लावल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
* सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर
सुरक्षितेसाठी सीसीटिव्ही लावण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. मात्र, दुकानात सीसीटिव्ही लावून त्याचा बॅकअपही चोरट्यांनी लांबवल्याने अजून काय करावे असाच प्रश्न ज्वेलर्स दुकानदारांना पडला आहे.
* सुरक्षारक्षक होता का नाही?
दुकानात सीसीटिव्ही असताना रात्री दुकानाबाहेर सुरक्षारक्षक होता का? असाच प्रश्न पोलिसांकडून दुकानदारांना विचारला जात आहे. सुरक्षारक्षक नसेल तर तो का नव्हता अशा अनेक प्रश्नांचा भडीमार पोलिसांकडून केला जाते. शिवाय सीसी टीव्ही कॅमेर्यांचे हार्ड डिस्क नेमकी कोणत्या ठिकाणी लपवून ठेवली आहे, हे चोरट्यांना कसे काय माहित झाले, याविषयी कोणी टीप दिली होती का असे प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहेत़
(प्रतिनिधी)