ठाण्यात यंदाही महापूर ?
By Admin | Updated: April 26, 2015 22:47 IST2015-04-26T22:47:07+5:302015-04-26T22:47:07+5:30
या वर्षी साधारणपणे १५ जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता स्कायमेट या संस्थेने व्यक्त केली आहे. त्या अनुषंगाने एप्रिलमध्ये

ठाण्यात यंदाही महापूर ?
ठाणे : या वर्षी साधारणपणे १५ जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता स्कायमेट या संस्थेने व्यक्त केली आहे. त्या अनुषंगाने एप्रिलमध्ये नालेसफाईला सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र, नालेसफाईच्या निविदांची प्रक्रिया आता एप्रिलअखेरीस सुरू झाली आहे. त्यामुळे यंदा ठाणे तुंबणार असल्याची शक्यता आहे. पालिका आयुक्त संजय जयस्वाल हे रजेवर गेल्याने पावसाळापूर्व कामे करायची तरी कशी, असा प्रश्न उभा राहिला आहे.
ठाणे शहरात वार्षिक सरासरी पर्जन्यमान सुमारे २५०० मिमी एवढे आहे. या पार्श्वभूमीवर शहरामध्ये विविध ठिकाणी साचणाऱ्या पाण्याला प्रतिबंध करणे, पूरस्थिती टाळण्यासाठी पाण्याचा योग्य निचरा करणे व त्यासाठी सुनियोजित अशा पर्जन्यवाहिन्यांचे नियोजन, संकल्पना, विकास आणि बांधकाम आदी कामांना मार्चअखेरीस सुरुवात होणे गरजेचे असते. सद्य:स्थितीमध्ये शहरामध्ये माजिवडा, वागळे इस्टेट आणि कोपरी आदी भागांत एकूण ४५ किलोमीटर लांबीचे नाले अस्तित्वात आहेत. कळवा, मुंब्रा- शीळ भागांत एकूण ३५ किमी लांबीचे नाले आहेत.
तसेच शहराच्या अनेक ठिकाणी नाल्यांच्या प्रवाहामध्ये पाणीपुरवठा वाहिन्या, मलवाहिन्या, विद्युत मंडळ, महानगर टेलिफोनच्या केबल्स गेलेल्या असल्यामुळे नाल्यांच्या प्रवाहामध्ये अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. यामुळे पावसाळ्यात शहरामध्ये झोपडपट्टी आणि खाडीशेजारील भागात पाणी साचते, हा दरवर्षीचा अनुभव आहे.
दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या, वाढत्या विकासामुळे रन आॅफ मध्ये होणारी वाढ, जमिनीची धूप, नाल्यांवरील अतिक्र मणे व विविध सेवावाहिन्यांमुळे नाल्यांच्या प्रवाहाला होणारा अडथळा यासाठी ठामपाने जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत एकात्मिक नाले विकास प्रकल्प हाती घेतला आहे.
आजमितीस या प्रकल्पांतर्गत तिन्ही टप्प्यांमध्ये काम प्रगतीपथावर असून ते काम येत्या काही दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
या प्रकल्पांसाठी अंदाजे ३६४ कोटी रु पये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये १० मीटरपेक्षा जास्त लांबीच्या नाल्यांचा समावेश आहे. मात्र, शहरातील झोपडपट्टी भागांतून जाणारे नाले कमी खोलीचे आहेत. या नाल्यांची खोली वाढविणे, या नाल्यांमधील गाळ काढणे, रस्त्यांलगतच्या नाल्यांचा गाळ काढणे, रेल्वे कल्व्हर्ट सफाई करणे आदी कामे एप्रिलच्या सुरुवातीला सुरू करणे अपेक्षित असते. मात्र, अद्यापही या कामांना सुरुवात करण्यात आलेली नाही.