'मुंबई क्रीडा विभागातून ठाणे, पालघर वगळा'
By Admin | Updated: August 11, 2015 04:23 IST2015-08-11T04:23:00+5:302015-08-11T04:23:00+5:30
ठाणे, पालघर आणि इतर ७ महानगरपालिकांतील विद्यार्थ्यांना मुंबई क्रीडा विभागातून वगळण्याची मागणी शिक्षक परिषदेने सोमवारी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना केली आहे.
'मुंबई क्रीडा विभागातून ठाणे, पालघर वगळा'
मुंबई : ठाणे, पालघर आणि इतर ७ महानगरपालिकांतील विद्यार्थ्यांना मुंबई क्रीडा विभागातून वगळण्याची मागणी शिक्षक परिषदेने सोमवारी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना केली आहे. शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडत असल्याने त्यांना मुंबई विभागातून वेगळे करण्याची मागणी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी केली आहे. शहरी भागातील क्रीडापटूंना अनेक सोयीसुविधांचा लाभ मिळतो. याउलट ग्रामीण आणि आदिवासी भागांतील क्रीडापटू अनेक सोयी-सुविधांपासून वंचित असतात. परिणामी एकाच विभागात या दोन्ही क्रीडापटूंची तुलना केल्यास शहरी क्रीडापटूंच्या तुलनेत ग्रामीण क्रीडापटूंची पिछेहाट होते. त्यामुळे ठाणे व पालघरसह या दोन्ही जिल्ह्यांतील नगरपालिकांमध्ये मोडणाऱ्या क्रीडापटूंचा एक स्वतंत्र क्रीडा विभाग निर्माण करण्याची माणगी मोते यांनी केली आहे. शालेय विभागाच्या विविध क्रीडा स्पर्धा जिल्हा आणि राज्यस्तरावर होत असतात. प्रशासनाने प्रत्येक महानगर आणि नगरपालिकांना एका क्रीडा स्पर्धा जिल्ह्याचा दर्जा दिला आहे. त्यानुसार नऊ जिल्ह्यांची निर्मिती होते. याबाबत बोलताना शिक्षक परिषदेचे मुंबई उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले, मुंबई उपनगर व मुंबई शहर जिल्ह्यांच्या तुलनेत ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला व क्रीडा कौशल्याला वाव मिळत नाही. त्यामुळे शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन मुंबई विभागाचे विभाजन करून ठाणे व पालघर जिल्ह्याला स्वतंत्र क्रीडा विभागाचा दर्जा देण्याची गरज आहे. जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थीही शहरी विद्यार्थ्यांच्या बरोबरीने मैदानात उतरतील.