ठाणे-डोंबिवलीत मंत्रिपदासाठी चुरस
By Admin | Updated: July 6, 2016 01:56 IST2016-07-06T01:56:50+5:302016-07-06T01:56:50+5:30
राज्यातही अवघ्या दोन-तीन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याने ठाणे जिल्ह्यातून नेमके कुणाला स्थान मिळणार याबाबत चर्चेला उधाण आले आहे. मंत्रिपदासाठी भाजपाच्या

ठाणे-डोंबिवलीत मंत्रिपदासाठी चुरस
- अनिकेत घमंडी, डोंबिवली
राज्यातही अवघ्या दोन-तीन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याने ठाणे जिल्ह्यातून नेमके कुणाला स्थान मिळणार याबाबत चर्चेला उधाण आले आहे. मंत्रिपदासाठी भाजपाच्या आमदारांत तीव्र चुरस असून ठाणे पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर लाल दिवा मिळवण्यासाठी संजय केळकर उत्सुक आहेत, तर वेगवेगळ््या कामगिरीच्या जोरावर रवींद्र चव्हाण यांनी आपला दावा पक्का केला आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भाजपाला स्थान मिळवून देणारे किसन कथोरे यांचाही दावा भक्कम असल्याचा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत.
यातही ठाणे आणि डोंबिवली या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहरांत राजकीय वर्चस्वासाठी मोठी चुरस असल्याचे मानले जाते.
ठाणे पालिका निवडणुकीचा निकष लावला आणि त्या कारणासाठी ठाण्यात पक्षाकडे लाल दिवा हवा, ही भूमिका पक्षाने घेतली तरच संजय केळकर यांना संधी मिळू शकते. पण त्यांना मंत्रिपद देऊन निवडणुकीत पक्षाला कितपत फायदा होईल, यावर मतभिन्नता असल्याने त्यांचे नाव चर्चेत असले तरी त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
त्याचवेळी शिवसेनेशी थेट लढाई करत कल्याण-डोंबिवली पालिकेत पक्षाला मिळवून दिलेले यश, स्मार्ट सिटीचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न, प्रोबेस कंपनीतील भरपाईचा मुद्दा याबाबत डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांचे काम वाखामण्याजोगे असल्याने त्यांचा दावा प्रबळ मानला जातो.
यापूर्वी महामंडळाचे उपाध्यक्षपद सांभाळलेले आणि बदलापूर, मुरबाडमध्ये भाजपाचे स्थान बळकट करणारे किसन कथोरे यांचे नावही चर्चेत आहे. यातील चव्हाण, कथोरे हे दोन वेळा विधानसभेवर, तर केळकर एकदा विधान परिषदेवर आणि आता विधानसभेवर निवडून गेले आहेत.
नरेंद्र पवारांना फायदा होणार का?
कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार, कल्याण पूर्वमधील भाजपला पाठींबा दिलेले अपक्ष आमदार गणपत गायकवाड आदींनाही मंत्रीपद अथवा महामंडळ मिळावे, अशी त्यांच्या समर्थकांची अपेक्षा आहे.
नरेंद्र पवार परिवारातील असल्याचा, अभाविपचे कार्यकर्ते असल्याचा आणि प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या मर्जीतील असल्याचा त्यांना फायदा होईल, असे त्यांच्या मित्र परिवाराला वाटते.