ठाणे जिल्ह्यात ४३ टक्के मतदान

By Admin | Updated: October 16, 2014 00:11 IST2014-10-16T00:11:16+5:302014-10-16T00:11:16+5:30

या जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४३.८१ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी जिल्हाप्रशासनाने दिली. सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या मतदानाची अंतिम आक

Thane district has 43 percent voting | ठाणे जिल्ह्यात ४३ टक्के मतदान

ठाणे जिल्ह्यात ४३ टक्के मतदान

ठाणे : या जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४३.८१ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी जिल्हाप्रशासनाने दिली. सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या मतदानाची अंतिम आकडेवारी मध्यरात्रीपर्यंत हाती येईल असा अंदाज निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ही आकडेवारी गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत अधिक असल्याचे समजते. मात्र शेजारच्या नव्या पालघर जिल्ह्यातील मतदारांनी सरासरी ६० टक्के मतदान करून बाजी मारली. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदान शहापूरमध्ये ५७.९१ टक्के झाले. तर सर्वात कमी मतदान उल्हासनगरमध्ये २९.३० टक्के एवढे झाले. सुशिक्षितांची नगरी म्हणविणाऱ्या डोंबिवलीत ३९.६६ एवढे कमी मतदान झाले. अन्य मतदारसंघाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. भिवंडी ग्रामीण ५३.७१, भिवंडी प. ४३.२२, भिवंडी पू. ३६.८९, कल्याण प. ४०.९४, मुरबाड ४९.५३, अंबरनाथ ३१.९७, कल्याण पू. ४२.२०, कल्याण ग्रा.४६.३७, मुंब्रा-कळवा ४६.२०, मीरा-भाईंदर ४९.४८, ओवळा-माजीवडा ५०.४७, कोपरी-पाचपाखाडी ५०.८५, ठाणे ५३.१७, ऐरोली ५०.३७, बेलापूर ४८.८२ टक्के अशी होती. ही टक्केवारी अंतिम आकडेवारीत ५ ते ७ टक्क्यांपर्यंत वाढू शकते असेही सुत्रांनी म्हटले आहे. दिवा येथील दोन पक्षाच्या गटातील हाणामारीचा अपवाद वगळता मतदान सर्वत्र शांततेने झाले. अनेक ठिकाणी मतदार यादीत नाव नसणे, नाव चुकीचे असणे, मतदारांची नावे दुबार असणे, पत्ता चुकीचा असणे अशा त्रुटी आढळल्याने मतदारांवर मतदान न करताच घरी जाण्याची वेळ आली. कल्याण ग्रामीण मतदारसंघात नोटाचा वापर संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणात मतदारांनी केला, असे वृत्त होते.
यावेळी युती नव्हती, आघाडीही नव्हती त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजप हे चारही पक्ष स्वतंत्रपणे लढत होते. त्यात मनसेची भर पडली होती. अशा स्थितीत मतदानाचा टक्का वाढेल व राजकीय लढतीतील चुरस मतदानाच्या वाढलेल्या प्रमाणाच्या रुपाने पहायला मिळेल, अशी सगळ्यांची अपेक्षा होती. परंतु ती मतदारांनी फोल ठरविली. निवडणूक आयोगाने विविध स्तरावर केलेली जनजागृती आणि नोंदीत मतदारांच्या संख्येत झालेली वाढ व नव मतदारांच्या संख्येत झालेली वाढ या सगळ्याचा फारसा परिणाम मतदानाचा टक्का वाढण्यात फारसा झालेला आढळून आलेला नाही. एकापरीने आजच्या राजकारणाबाबत आणि निवडणूक लढविणाऱ्या नेत्यांबाबत मतदारांनी व्यक्त केलेली ही अनास्था असू शकते असाही सूर विविध वाहिन्यांवरील चर्चेत व्यक्त होत होता. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी आणि त्यांचे केंद्रीय मंत्रीमंडळातील सहकारी तसेच शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचाराचा झंझावात उभा केला. तरी ते मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यात फारसे यशस्वी ठरले नाही. अशी चर्चाही मतदारांमध्ये होती.
भिवंडी पूर्व मतदारसंघातील ताडाली गावातील शाळा क्र.५२ मध्ये सकाळी व्होटींग मशीन बंद झाल्याची घटना घडली. केंद्रप्रमुखाच्या लक्षात येताच ती मशीन बदलण्यात आली. किरकोळ घटना वगळता मतदानाची संपूर्ण प्रक्रीया तशी शांततेत पार पडली. शहापूरमध्ये झालेल्या हाणामारीचे गालबोट या मतदानाला लागले. (प्रतिनिधी)

Web Title: Thane district has 43 percent voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.