ठाणे-दादर व्होल्वो होणार बंद
By Admin | Updated: January 11, 2015 01:15 IST2015-01-11T01:15:52+5:302015-01-11T01:15:52+5:30
परिवहनने ठाणे-दादर मार्गावर नव्या व्होल्वो बस मोठ्या दिमाखात सुरू केल्या. परंतु, या मार्गावर प्रवाशांची संख्या अपुरी असल्याने उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होऊ लागला आहे.

ठाणे-दादर व्होल्वो होणार बंद
ठाणे : परिवहनने ठाणे-दादर मार्गावर नव्या व्होल्वो बस मोठ्या दिमाखात सुरू केल्या. परंतु, या मार्गावर प्रवाशांची संख्या अपुरी असल्याने उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होऊ लागला आहे. त्यामुळे ठाणे-दादर हा मार्ग महिनाभरात बासनात गुंडाळला जाणार आहे.
मीरा रोड हा परिवहनचा सर्वात महत्त्वाचा आणि उत्पन्न देणारा स्रोत होता. मीरा रोड मार्गावर चालणाऱ्या ठेकेदाराच्या २५ बस बंद झाल्यानंतर या मार्गावर ठाणे परिवहनने आपल्या ताफ्यातील १० बस उतरविल्या. प्रवाशांची संख्या लक्षात घेता त्या अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे येथे बस वाढवाव्यात, अशी मागणी केली जात आहे. परंतु, अद्याप बस वाढविण्यात आलेल्या नाहीत. विशेष म्हणजे मुंबईत नव्याने आलेल्या व्होल्वो बस मोठ्या दिमाखात परिवहनने सुरू केल्या. परंतु, या मार्गावर प्रवाशांची संख्या अपुरी असल्याने ठाणे ते दादर हा मार्ग बासनात गुंडाळला जाणार आहे.
दरम्यान, दुसरीकडे जेएनएनयूआरएमअंतर्गत २३० बस टप्प्याटप्प्याने दाखल होत आहेत. त्यातील व्होल्वो बस दाखल झाल्या असून ठाणे ते बोरिवली, सिप्झ, वांद्रे आणि दादर या मार्गांवर सध्या त्या धावत आहेत. काही महिन्यांपूर्वी मीरा रोड मार्गावर धावणाऱ्या खाजगी ठेकेदाराच्या बस बंद झाल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील सेवा बंद करून ती ठाणे-बोरिवली या मार्गावर वळविण्यात येणार असल्याचे परिवहनने स्पष्ट केले आहे.
बसमागे किमान दोन हजारांचा तोटा
ठाण्याच्या विविध भागांतून पाच व्होल्वो दादर मार्गावर धावतात. परंतु, या मार्गावरील प्रत्येक बसचे उत्पन्न हे दिवसाला ३ ते ४ हजारांच्या घरात आहे. प्रत्यक्षात डिझेलवरच पाच ते सहा हजारांचा खर्च रोज होत असताना त्यादृष्टीने उत्पन्न होत नसल्याने हा मार्ग पूर्णपणे तोट्यात जात असल्याचे मत परिवहनने व्यक्त केले आहे.
आवश्यक बस६००
उपलब्ध बस३१३
चालू बस१७०-१८०
रोजचे प्रवासी१.५ लाख
रोजचे उत्पन्न१८ ते २० लाख