ठाण्याचेही होऊ शकते ‘माळीण’?

By Admin | Updated: August 15, 2014 01:56 IST2014-08-15T01:56:42+5:302014-08-15T01:56:42+5:30

पुणे जिल्ह्यातील ‘माळीण’ची पुनरावृत्ती ठाण्यात होऊ नये, यासाठी कळवा, मुंब्रा आणि नवी मुंबईतील तब्बल १६ हजार ६०० कुटुंबांना वन विभागाने घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत

Thane can be 'Malin'? | ठाण्याचेही होऊ शकते ‘माळीण’?

ठाण्याचेही होऊ शकते ‘माळीण’?

जितेंद्र कालेकर, ठाणे
पुणे जिल्ह्यातील ‘माळीण’ची पुनरावृत्ती ठाण्यात होऊ नये, यासाठी कळवा, मुंब्रा आणि नवी मुंबईतील तब्बल १६ हजार ६०० कुटुंबांना वन विभागाने घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. जर दरड कोसळून अशीच एखादी दुर्घटना झाली तर याला राज्य शासन किंवा वन विभाग जबाबदार राहणार नसून सर्वस्वी जबाबदारी अतिक्रमण करणाऱ्या रहिवाशांची राहणार असल्याचे या नोटिशीद्वारे बजावण्यात आले आहे.
ठाणे वन परिक्षेत्राने २०१०मध्येच ही घरे खाली करण्याच्या नोटिसा या ठिकाणी अतिक्रमण करून वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांना बजावल्या आहेत. मात्र, तरीही अनेकांनी ही घरे खाली नाहीत. पावसाळ्यापूर्वीच या ठिकाणी सुमारे ५०० घरांवर कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, माळीण गावातील दुर्घटनेच्या तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिसंवेदनशील भागातील रहिवाशांना आता नोटीस तसेच फलकांद्वारे घरे खाली करण्याचे बजावण्यात आल्याची माहिती ठाण्याचे रेंज फॉरेस्ट आॅफिसर इच्छांत कांबळी यांनी ‘लोकमत’ला दिली.
कळवा वन विभागाच्या कळवा, घोलाईनगर, आतकोनेश्वरनगर, पारसिकनगर, रेतीबंदर, मुंब्रा, कौसा, शीळ सर्व्हे क्र. ७२ आदी परिसरातील १६ हजार ६०० जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. घोलाईनगर, चर्च परिसर, इंदिरानगर, आतकोनेश्वरनगर, ठाकूरपाडा आणि कारगिल खोंडा या भागात फलकाद्वारेही इशारा दिला आहे.
कळवा आणि पारसिकनगरातील तब्बल ९ हजार रहिवाशांचा यामध्ये समावेश आहे. घोलाईनगर, इंदिरानगर, शिवशक्तीनगर, विश्वकर्मा चाळ आणि आतकोनेश्वरनगर, पौडपाडा, भास्करनगर, वाघोबानगर, दिघा इलठणपाडा तर मुंब्रा रेतीबंदरमध्ये ३ हजार ६०० रहिवाशांमध्ये कैलासगिरी वस्तीचा समावेश आहे. सैनिकनगर व पाणेरीपाडा आणि शीळ सर्व्हे क्रमांक ७२ येथील प्रत्येकी २ हजार आणि रबाड्यातील २०० कुटुंबीयांचा यामध्ये समावेश आहे.

Web Title: Thane can be 'Malin'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.