दहीहंडीवरून ठाणे सेनेत ‘तीनतिघाडा काम बिघाडा’
By Admin | Updated: August 13, 2014 00:11 IST2014-08-13T00:11:05+5:302014-08-13T00:11:05+5:30
दहीहंडी साजरा करण्यावरून ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे़ शिवसेनेतील पक्षांतर्गत सुंदोपसुंदीने तर ‘तीनतिघाडा काम बिघाडा’ या म्हणीचा प्रत्यय आणून दिला आहे़

दहीहंडीवरून ठाणे सेनेत ‘तीनतिघाडा काम बिघाडा’
नारायण जाधव, ठाणे
दहीहंडी साजरा करण्यावरून ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे़ शिवसेनेतील पक्षांतर्गत सुंदोपसुंदीने तर ‘तीनतिघाडा काम बिघाडा’ या म्हणीचा प्रत्यय आणून दिला आहे़
न्यायालयाच्या निर्णयाचे ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी स्वागत करून आपली दहीहंडी रद्द करून ‘संस्कृती’ जपण्याच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले असताना त्यांच्याच पक्षाचे जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे आणि नव्याने आलेले रवींद्र फाटक यांनी मात्र, याविरोधात भूमिका घेऊन दहीहंडी उत्सव दणक्यात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे़ एकाच पक्षातील मोठ्या नेत्यांमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यावरून उफाळून आलेल्या या मतभेदांनी ठाण्याच्या राजकारणातील खरा ‘संघर्ष’ही दिसून आला आहे़
सरनाईक यांच्या संस्कृती मंडळाने साधेपणाने उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असताना त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र आपले मंडळ मोठ्या दणक्यात हा उत्सव साजरा करेल, असे जाहीर केले आहे़ आव्हाडांच्या या भूमिकेमागचे राजकारण समजून न घेता ठाण्यातील उतावळ्या शिवसेना नेत्यांनी मात्र परस्परविरोधी भूमिका घेऊन आपल्यातील छुप्या संघर्षाचे दर्शन घडविले आहे़ सरनाईक यांचा निर्णय हा पक्षाचा नसून त्यांचा वैयक्तिक आहे, हे सांगण्यास ही मंडळी विसरली नाहीत़ मात्र, शिवसेनेतील या संघर्षाचा फायदा विधानसभा निवडणुकीत आघाडीचे नेते उठविण्याची शक्यता आहे़