Join us
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरासाठी थंडी ‘विश्रांती’ घेणार; राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 05:38 IST

रविवारी मुंबईचे किमान तापमान १७ अंश नोंदवण्यात आले आहे.

मुंबई : दक्षिण भारतावर धडकलेल्या चक्रीवादळाचा विपरीत परिणाम म्हणून दोन डिसेंबर ते पाच डिसेंबरपर्यंत राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. चक्रीवादळामुळे राज्याच्या दक्षिण भागात हवामान ढगाळ नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे थंडी कमी झाली असून आठवडाभरासाठी थंडी ‘विश्रांती’ घेणार असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे रविवारी मुंबईचे किमान तापमान १७ अंश नोंदवण्यात आले आहे.

उत्तर पूर्वेकडून राज्याकडे वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे शहरांच्या किमान तापमानात घसरण झाली होती. उत्तर मध्य महाराष्ट्राला तर थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. तत्पूर्वी, किमान तापमानाचा पारा वर खाली होत असतानाच दक्षिणेकडे आलेल्या चक्रीवादळामुळे आता पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार दक्षिण मध्य महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहील. या बदलत्या वातावरणाचा परिणाम म्हणून १० अंशाखाली गेलेले किमान तापमान आता १५ वर पोहोचेल. रविवारी देखील किमान तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात  पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतातून महाराष्ट्रात थंडी घेऊन येणारे थंड व कोरड्या उत्तरी वाऱ्यांना चक्रीवादळाने अटकाव केला आहे. त्यात दमटपणा काहीसा वाढण्याची शक्यता आहे. आठवड्यात पहाटेच्या किमान व दुपारच्या कमाल अशा दोन्हीही तापमानात किंचितशी वाढ होऊन संपूर्ण महाराष्ट्रात आठवडाभर थंडी कमी होईल. सध्या महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान २८ तर पहाटेचे किमान तापमान १२ ते १४ आहे.

- माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ