थॅलेसिमीया रोखता येऊ शकतो!

By Admin | Updated: May 8, 2015 00:38 IST2015-05-08T00:38:57+5:302015-05-08T00:38:57+5:30

थॅलेसिमीया हा रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये दोष निर्माण झाल्यामुळे होणार आजार आहे. नवरा - बायको दोघेही थॅलेसिमीया मायनर असल्यास होणारे बाळ थॅलेसिमीया

Thalassemia can be prevented! | थॅलेसिमीया रोखता येऊ शकतो!

थॅलेसिमीया रोखता येऊ शकतो!

पूजा दामले, मुंबई
थॅलेसिमीया हा रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये दोष निर्माण झाल्यामुळे होणार आजार आहे. नवरा - बायको दोघेही थॅलेसिमीया मायनर असल्यास होणारे बाळ थॅलेसिमीया मेजर असण्याचा धोका ७५ टक्के असतो. थॅलेसिमीयासारखा गंभीर आजार टाळण्यासाठी तरुणांनी थॅलेसिमीयाची चाचणी करून घेतली पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
५ कोटी भारतीयांना ‘थॅलेसिमीया मायनर’ हा आजार आहे. पण, थॅलेसिमीया हा रक्ताचा आजार आहे, इतकीच माहिती लोकांना असते. कोणीही थॅलेसिमीयाची तपासणी करून घेत नाही. मुलगा आणि मुलगी दोघेही थॅलेसिमीया मायनर असतात. पण, त्यांनाही माहीत नसते. दोघे लग्न करतात. या दाम्पत्याला आपल्या मुलाला थॅलेसिमीया मेजर हा आजार होण्याचा धोका असल्याची कल्पनाच नसते. लग्नाआधीच तरुणांनी थॅलेसिमीयाची तपासणी करून घेतल्यास थॅलेसिमीया रोखण्यास मदत होऊ शकते, असे मत थिंक फाउंडेशनचे उपाध्यक्ष विनय शेट्टी यांनी व्यक्त केले.
गर्भधारणा झाल्यावर पहिल्या दोन महिन्यांत गर्भाची तपासणी केल्यास मुलाला थॅलेसिमीया मेजर आजार होणार की नाही, हे कळते. या तपासणीत बाळाला थॅलेसिमीया मेजर होण्याचा धोका दिसल्यास गर्भपात करण्याचा सल्ला दिला जातो. थॅलेसिमीया मेजर मुलाला रक्ताची नितांत गरज असते. पण, याचबरोबरीने इतर औषधे आणि तपासणी करण्याची आवश्यकता असल्याने उपचारांचा खर्च जास्त असतो. थॅलेसिमीया मेजर असलेली मुले जसजशी मोठी होतात त्यांचे वजन वाढते तशी त्यांना रक्ताची गरज वाढते. पण अनेकदा मुलांना रक्त मिळण्यास त्रास होतो.
२००० सालापासून सरकारने थॅलेसिमीयाच्या मुलांना रक्त मोफत द्यावे असे आदेश रक्तपेढ्यांना दिले आहेत. यामुळे या मुलांना रक्त मोफत मिळते. पण, जेव्हा रक्तपेढीत रक्त नसते तेव्हा या मुलांना खूप त्रास सहन करावा लागतो.
दरवर्षी मे आणि जून महिन्यांत रक्ताची चणचण भासते. याचे मुख्य कारण म्हणजे शाळा, महाविद्यालये बंद असतात. जास्त रक्तदान शिबिरे भरविली जात नाहीत. यामुळे या काळात रक्ताचा तुटवडा जाणवतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी ऐच्छिक रक्तदानाचे प्रमाण वाढले पाहिजे. याचबरोबरीने रक्तदान मोहीम चांगल्या पद्धतीने राज्यात रुजणे आवश्यक आहे, असे शेट्टी यांनी
सांगितले.
मोफत रक्त मिळून हा प्रश्न सुटण्यासारखा नाही. थॅलेसिमीयाच्या मुलांना रक्तातील रेड ब्लड सेल द्याव्या लागतात. एक युनिट रेड ब्लड सेल दिल्याने त्यांच्या शरीरातील लोह वाढते. लोहाची पातळी कमी करण्यासाठी त्यांना गोळ्या घ्याव्या लागतात. या मुलांच्या किडनी, फुप्फुस, यकृत यांच्या तपासण्या करणे गरजेचे असते.

Web Title: Thalassemia can be prevented!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.