स्वयंसेविकांचा थाळीनाद
By Admin | Updated: February 3, 2015 23:23 IST2015-02-03T23:23:56+5:302015-02-03T23:23:56+5:30
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण भागात काम करणाऱ्या गट प्रवर्तक व आशा स्वयंसेवीकांना ९ महिन्यापासुन केलेल्या कामांचा मोबदला अजुन देण्यात आला नाही.

स्वयंसेविकांचा थाळीनाद
पालघर : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण भागात काम करणाऱ्या गट प्रवर्तक व आशा स्वयंसेवीकांना ९ महिन्यापासुन केलेल्या कामांचा मोबदला अजुन देण्यात आला नाही. या विरोधात स्वयंसेविकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयावर मंगळवारी थाळीनाद मोर्चा काढून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
पालघर रेल्वेस्टेशन येथून काढण्यात आलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोलीसांनी अडवला. गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ग्रामीण, आदिवासी, अतिदुर्गम तालुक्यातून काम करीत आहेत. ग्रामीण भागातील गाव, पाडे तर खेडोपाड्यातील घराघरामध्ये जाऊन योग्य आरोग्य सेवा पुरविण्याची कामे या स्वयंसेविका सचोटीने करीत आल्या आहेत. एप्रिल २०१४ पासुन गटप्रवर्तकाना ८५० रू. तर सहाय्यक आशा कर्मचाऱ्यांना ५०० रू. वाढीव मानधन लागु करण्यात आले आहेत. परंतु आपले मानधन व वाढीव मानधन यापैकी आजपर्यंत ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी विभागाकडून अजुनही देण्यात आलेले नाही.
मानधनाव्यतिरीक्त स्वयंसेविकाना ग्रामस्तरावर आरोग्य विषयक माहिती व अहवालाचे अचुक संकलन केल्यास दरमहा ५०० रू. संचालक राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन या आदेशानुसार थकबाकीसह देण्यात यावा, तसेच गणवेश खरेदीसाठी रक्कम त्वरीत मिळावी, मोबाईल रिचार्जसाठी जाहीर झालेले दरमहा ५० रूपये त्वरीत मिळावे, अपमानास्पद मिळणारी वागणूक बंद व्हावी, स्वयंसेविकांना कुटूंब नियोजनाच्या केसेस प्रसुतीच्या केसेस आणल्यावर त्याची नोंद आरोग्य सेवीकांच्या नावाने होते ती स्वयंसेवकांच्या नावे व्हावी इ. मागण्याचे निवेदनही उपमुख्यकार्यकारी अधिकारी देव ऋषी यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता केंद्राच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य विभागाकडून स्वयंसेवीकांचे मानधन उशीराने प्राप्त झाले. व ते ही फक्त आॅक्टोबर महिन्यापर्यंतच आल्याचे समजते. त्याचे वाटपही ठाणे जिल्हा परिषदेकडून होत आहे. तरीही पालघर जिल्हयांतर्गत तालुकास्तरावरील आरोग्य अधिकाऱ्यांना थकीत मानधन येत्या आठवडाभरात देण्याचे निर्देश मी दिले आहेत. अन्य मागण्या शासनदरबारी कळविणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. (वार्ताहर)