Join us  

ठाकरेंच्या खास माणसाचा निकटवर्तीय शिंदेंच्या शिवसेनेत; मुख्यमंत्र्यांच्याहस्ते पक्षप्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2023 8:39 AM

शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात येणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे.

राज्यातील आश्चर्यकारक सत्ताबदलानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची वर्णी लागली. तर, शिवसेनेच्या ठाकरे गटाला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगला असून शिवसेना विरुद्ध शिवसेना असाही सामना रंगला आहे. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंना संधी मिळाल्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेना पक्षावर दावा सांगण्यात आला. त्यानुसार, पक्षात अनेक नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे प्रवेशही करुन घेण्यात येत आहेत. नुकतेच मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते अनिल देसाई यांचे  निकटवर्तीय मारुती साळुंखे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात येणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी आमदार सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. आता, शिवसेना सचिव अनिल देसाई यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेच्या प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असलेले मारुती साळुंखे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यासंदर्भात स्वत: मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विटरवरुन माहिती दिली. 

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आणि सचिव अनिल देसाई यांचे निकटवर्तीय तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची संघटना आणि प्रशासकीय कामातील माहितगार मारुती साळुंखे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले. मारुती साळुंखे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पक्षाची नव्याने बांधणी करण्याच्या कामाला बळ मिळणार आहे. तसेच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेली संघटना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी त्यांचा मोठा उपयोग होणार आहे, असेही यावेळी शिंदेंनी म्हटले. दरम्यान, यावेळी शिंदे गटाच्या महिला प्रवक्त्या शितल म्हात्रे याही उपस्थित होत्या.  

टॅग्स :शिवसेनाएकनाथ शिंदेमुंबईअनिल देसाई