Join us

ठाकरे-शिंदेंचे आज शक्तिप्रदर्शन; शिंदे गटाचा मेळावा नेस्कोला तर उद्धवसेनेचा शिवाजी पार्कवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 08:54 IST

दादरच्या शिवाजी पार्क मैदानात गुरुवारी उद्धवसेनेचा सायंकाळी ५ वाजता तर गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणाऱ्या शिंदेसेनेच्या सायंकाळी ६ वाजेच्या दसरा मेळाव्यांकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क मैदानात गुरुवारी उद्धवसेनेचा सायंकाळी ५ वाजता तर गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणाऱ्या शिंदेसेनेच्या सायंकाळी ६ वाजेच्या दसरा मेळाव्यांकडे राज्याचे लक्ष लागले आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यांतून दोन्ही पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे. राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भर देत दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भाषणे होतील.शिंदेसेनेचा मेळावा सुरुवातीला आझाद मैदानात होणार होता, मात्र पावसामुळे मैदानात चिखल झाल्याने तो नेस्को सेंटरमध्ये घेण्यात येणार आहे. दुसरीकडे, चिखल आणि पाणी साचले असले तरी उद्धवसेनेचा मेळावा शिवतीर्थावरच होणार आहे. ‘शिवतीर्थ साक्ष देतंय हिंदुत्वाच्या हुंकाराची’, अशा घोषवाक्यासह उद्धवसेनेने नवीन टीजर प्रसिद्ध केला आहे. त्यात नव्या दमाची ठिणगी असे म्हणत आदित्य ठाकरेंच्या भाषणाचे काही अंश समाविष्ट केले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुका आदित्य यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात येणार असल्याचा संदेशही मेळाव्यापूर्वी देण्यात आला आहे.  

शिवतीर्थावर ठाकरे बंधूंचा बॅनर शिवाजी पार्क परिसरात उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एकत्रित पोस्टर्स झळकले आहेत. दादरचे शाखा संघटक आप्पा पाटील यांनी हे पोस्टर्स लावले असून, दोन्ही बंधूंनी एकत्र यावे, ही मराठी माणसांची इच्छा आहे. ठाकरे परिवार एकत्र राहावा, ही आमची अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले.

कुणाची भाषणे होणार? उद्धवसेनेच्या मेळाव्यात नेते आ. आदित्य ठाकरे, खा. संजय राऊत, आ. भास्कर जाधव व माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यानंतर उद्धव ठाकरे भाषण करणार आहेत. तर, शिंदेसेनेच्या मेळाव्याची सुरुवात प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांच्या भाषणाने होईल. त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री रामदास कदम यांची भाषणे होतील. तर शेवटी उपमुख्यमंत्री शिंदे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्गदर्शन करतील.

‘मनसे’सोबत युतीची घोषणा? महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ उद्धव यांच्याकडून फोडला जाणार आहे. तसेच, दसऱ्याच्या मुहूर्तावर मनसेशी संभाव्य युतीबाबत ते काही संकेत देतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

शेतकऱ्यांचेच मुद्दे घेणारपूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे, त्यामधून त्यांना बाहेर काढणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनी स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांना मेळाव्याला न येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांचे व विकासाचे मुद्दे घेऊन शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत, असे प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Thackeray, Shinde Factions to Flex Muscles with Dussehra Rallies Today

Web Summary : Uddhav and Shinde factions gear up for Dussehra rallies, focusing on Mumbai elections and farmers' issues. Uddhav may hint at alliance with MNS.
टॅग्स :दसरामुंबई