Join us

सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी आता ‘ड्रेस कोड’, ठाकरे गटाची महायुतीवर टीका; नेते म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 23:13 IST

Siddhivinayak Mandir Dress Code News: वर्षानुवर्षाची जी प्रथा आहे, ती तशीच सुरू राहिली पाहिजे, अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्यांनी केली.

Siddhivinayak Mandir Dress Code News: आताच्या घडीला मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी काही नियम असावेत, ही बाब विशेष लक्षात घेतली जात आहे. दक्षिण भारतातील अनेक मंदिरांमध्ये अशी नियमावली फार पूर्वीपासून लागू आहे आणि ती कठोरपणे अमलात आणली जाते. उत्तर भारतातीलही अनेक मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी येताना किंवा दर्शन घेताना काय परिधान करावे, याबाबत नियम करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात काही मंदिरांमध्ये या बाबत निर्णय होताना दिसत आहेत. या यादीत आता मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराची भर पडली आहे.

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. तसेच श्रीमंत मंदिरात सिद्धिविनायक मंदिराची गणना केली जाते. मुंबईत पर्यटनासाठी आलेले पर्यटक किंवा भाविक भक्तजन सिद्धिविनायक मंदिरात आवर्जून दर्शनाला जातात. केवळ पर्यटक किंवा भाविक नाहीत, तर राजकारणी, सेलिब्रिटी, दिग्गज मंडळी वेळात वेळ काढून सिद्धिविनायकाचरणी नतमस्तक होतात. याच सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेण्यासाठी आता ड्रेस कोड पाळावा लागणार आहे. काही भाविकांच्या तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे न्यासच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर प्लास्टिक बंदीचाही निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील आमदार सचिन अहिर यांनी पत्रकारांशी बोलताना या निर्णयावरून टीका केली आहे.  

तसे परिपत्रक काढण्याचा त्यांना अधिकार आहे का?

ज्यावेळेस विधान परिषदेत यासंदर्भात विधेयक आणले गेले होते. पद्धतशीरपणे तीन पक्षांच्या सदस्यांचा समावेश करण्यासाठी ही आकडेवारी वाढवण्यात आली होती, असा थेट आरोप मी केला होता. आता ज्यांनी परिपत्रक काढले आहे, तसे परिपत्रक काढण्याचा त्यांना अधिकार आहे का, कायदा आणि सुव्यवस्थेतेकडे त्यांनी ते दिले आहे का, असा सवाल सचिन अहिर यांनी केला. तसेच आताच असे परिपत्रक काढायची गरज का पडली. इतक्या वर्षानुवर्षे सिद्धिविनायक मंदिरातील दर्शन भावनात्मक पद्धतीने लोक घेतात. लोक सकाळी चालत येतात. मग कोणी ट्रॅक पँट घालून येतात किंवा अन्य काही कपडे घालून येत असतील, मग हे नवीन संशोधन करणारे कोण आहेत. भाविकांना जे नियम लागू केले जात आहेत, तसेच ते अध्यक्ष आणि ट्रस्टी यांच्याबाबतीत लागू केले जाणार आहेत का, अशी विचारणा सचिन अहिर यांनी केली. 

वर्षानुवर्षाची जी प्रथा आहे, ती तशीच सुरू राहिली पाहिजे

काही ना काही मुद्दा काढून लोकांच्या भावना पेटवायच्या आणि पुन्हा एका नवीन वादाला सुरुवात करून द्यायची, असे यानिमित्ताने होताना दिसत आहे. वर्षानुवर्षाची जी प्रथा आहे, ती तशीच सुरू राहिली पाहिजे, अशी मागणी यावेळी सचिन अहिर यांनी केली. स्वाभाविक आहे की, लोक आणि भक्तजन मूर्ख नाहीत. तेही देवासमोर नतमस्तक होताना काय आपण कपडे घातले पाहिजेत, कशा प्रकारे जायला पाहिजे, या भावना त्यांच्या असतात. अशा प्रकारे काही नियम काढून भक्तांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार होत आहे का, असा प्रश्न आहे, असे सचिन अहिर म्हणाले.

सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी नवे नियम कोणते?

श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासचे सदस्य राहुल लोंढे यांनी न्यासने घेतल्या निर्णयांबद्दल माहिती दिली. राहुल लोंढे म्हणाले की, मंडळाच्या विश्वस्तांची बैठक झाली. मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे. काही भक्तांच्या तक्रारी, तर काहींच्या सूचना न्यासकडे आल्या होत्या. मंदिरात काही भाविक येतात. ते कुठल्या जातीचे, धर्माचे पंथाचे असतील. स्त्री असो वा पुरुष. अनेकांचे पेहराव हे समोरच्या व्यक्तींना संकोच वाटेल असे होते. काही भाविक कसेही पेहराव करून येतात. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आहे की, पुढच्या आठवड्यापासून सिद्धिविनायक मंदिरात येणारा जो भक्त असेल, त्याचा पेहराव शालीनता आणि पावित्र्य जपणारा असावा. आपण मंदिरात येऊन श्रीगणेशाचे दर्शन घेतोय. त्याचे पावित्र्य जपले जाईल, अशा प्रकारचा पेहराव भाविकांचा असायला हवा, अशी माहिती लोंढे यांनी दिली. तसेच अमूक एक प्रकारचा पेहराव घालावा किंवा अमूक एका पद्धतीचे कपडे घालावेत असे निर्बंध नाहीत. परंतू जो पेहराव असेल, तो इतर भक्तांना संकोच वाटणारा नसावा. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला आहे. भाविकांनी वेडावाकडा पेहराव न करता यावे. पण, यापुढे तोकडे कपडे किंवा इतर भक्तांना संकोच वाटेल अशा प्रकारचे कपडे घालून येणाऱ्या व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला असल्याचे लोंढे यांनी सांगितले.  

टॅग्स :सिद्धिविनायक गणपती मंदिरशिवसेनासचिन अहिर