Join us

“फडणवीस-राज ठाकरे भेटीने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार नाही”; उद्धवसेनेचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 15:36 IST

Shiv Sena Thackeray Group Sushma Andhare News: राज ठाकरे एरव्ही भाजपाच्या प्रचंड विरोधात आक्रमक भूमिका घेतात आणि जेव्हा निवडणुका जवळ येतात, तेव्हा त्यांच्या भूमिका मवाळ होतात, अशी टीका करण्यात आली आहे.

Shiv Sena Thackeray Group Sushma Andhare News: राज्यात अनेक मुद्द्यांवरून राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे बीड, परभणी, मराठा आरक्षण, ईव्हीएमवर विरोधकांनी उपस्थित केलेली शंका यावरून राजकीय वातावरण तापत असतानाच दुसरीकडे महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली. यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे.

राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही कुठलीही राजकीय भेट नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांचा अभिनंदनाचा फोन आला. तेव्हा मी त्यांना सांगितले होते की मी घरी येईन, त्याप्रमाणे मी घरी गेलो होते. ब्रेकफास्ट केला, गप्पा मारल्या. या बैठकीचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही. केवळ मैत्रीकरिता मी त्यांच्या घरी गेलो होतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर, या दोन प्रमुख नेत्यांची सुमारे तासभर तरी बंद दाराआड चर्चा झाली, अशी माहिती मिळाली आहे.

फडणवीस-राज ठाकरे भेटीने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार नाही

राज ठाकरे यांचा पॉलिटिकल रिलिव्हन्स संपत चालला आहे. राज ठाकरे कुणावर बोलतात आणि त्यांच्याकडे कोण जाते, याने आता महाराष्ट्राच्या राजकारणात फार उलथापालथ होईल, असे वाटत नाही. महाराष्ट्रातील जनताच काय, पण मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आता या गोष्टीची सवय झाली आहे की, राज ठाकरे एरव्ही भाजपाच्या प्रचंड विरोधात आक्रमक भूमिका घेतात आणि जेव्हा निवडणुका जवळ येतात, त्यांच्या भूमिका मवाळ आणि भाजपाच्या जवळ जाणाऱ्या होतात. आत्ताही ज्या काही भेटी-गाठी दाखवण्याचा प्रयत्न चालला आहे, त्या महापालिका निवडणुकांच्या संदर्भात असू शकतात. पण हरकत नाही, असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. विधानसभा निवडणूक निकालानंतर राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करत सत्ताधारी महायुतीचा समाचार घेतला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस हे राज यांच्या भेटीसाठी पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या भेटीत फडणवीस यांनी राज ठाकरेंसोबत राजकीय घडामोडींबद्दल चर्चा करत काही प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. यामध्ये राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या राजकीय पुनर्वसनाचाही समावेश असल्याचे समजते.

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसराज ठाकरेसुषमा अंधारे