Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय शिरसाटांना ‘लफडे’ शब्द भोवणार; सुषमा अंधारेंची महिला आयोगाकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 08:26 IST

सुषमा अंधारे यांनी मागितली दाद; अहवालासाठी ४८ तासांची मुदत

मुंबई/छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची जीभ घसरली. त्यावरून अंधारे यांनी महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य शिरसाट यांनी केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. आयोगानेही दखल घेतली असून, पोलिसांकडे संबंधित संभाषणाचे व्हिडीओ मागवले आहेत. तसेच ४८ तासांत अहवाल देण्याचे निर्देशही दिले आहेत. 

महिला आयोगाने शिरसाट यांच्यावर तत्काळ कारवाई करावी. जोपर्यंत शिरसाटांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, अशी आक्रमक भूमिका सुषमा अंधारे यांनी घेतली आहे. आयोगाकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांकडून शिरसाट यांचे व्हिडीओ मागवले असून, त्यांचे वक्तव्य तपासून पुढचे निर्देश देण्यात येतील.

काय म्हणाले होते शिरसाट ?

छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या शिवसेना मेळाव्यात बोलताना आ. संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका करीत ‘ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत; पण त्या बाईने काय- काय लफडी केली आहेत, तिलाच माहीत,’ असे वक्तव्य केले होते.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी आ. संजय शिरसाट यांच्याविरोधात विनयभंगाचा तक्रार अर्ज मंगळवारी क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांच्याकडे देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. 

सुषमा अंधारेंचा पलटवार

शिरसाट यांनी महाराष्ट्रातील लेकीबाळीकडे बघण्याची त्यांची दृष्टी किती गलिच्छ आणि विकृतीने बरबटलेली आहे, याचाच पुरावा दिला आहे, असे अंधारे यांनी फेसबुकवर म्हटले आहे.  

मंत्र्यांसाठी वापरला शब्द

‘लफडे’ हा शब्द मी आर्थिक घोटाळ्यासंदर्भात, माझ्या दोन मंत्र्यांसाठी वापरला. सुषमा अंधारेबद्दल मी चुकीचे बोललो नाही. ती स्वत:ला विद्वान समजते; पण कधी तरी निवडणूक लढली का?, असे शिरसाट यांनी म्हटले आहे.

टॅग्स :संजय शिरसाटसुषमा अंधारे