Join us  

ठाकरे सरकारची रेस्टॉरंट सुरू करण्याची तयारी; मुख्यमंत्र्यांनी सांगितली 'वेळ'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 4:37 PM

आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई - राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली असून, ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते.मुख्यमंत्री म्हणाले की, एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, शारीरिक अंतर पाळणे ही रेस्टॉरंटसाठीची रेसिपी आहे. आपले नाते विश्वासाचे असल्याचेही सांगताना महाराष्ट्राला आपलं कुटुंब मानणारी प्रत्येक व्यक्ती या जबाबदारीचे भान ठेवून यात सहभागी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच सर्वांनी एकत्रित बसून मार्गदर्शक तत्त्वे अंतिम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. कोरोनाचे संकट मोठे असून, या संकटकाळात हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिक शासनासोबत असल्याचे समाधान वाटत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. कोरोनावर लस किंवा औषध उपलब्ध नाही, त्यामुळे कोरोनासोबत जगताना अत्यंत काळजीपूर्वक पुढे जावे लागत आहे. रुग्णांमध्ये पोस्ट कोविड लक्षणे दिसून येत आहेत. आर्थिक बाबींसाठी जबाबदारीने आपण काही पावले टाकायला सुरुवात केली आहे. 

आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते ते आपण एकेक सुरू करत आहोत. व्यवहार बंद ठेवणे हा काही आवडीचा विषय असूच शकत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कर रूपात राज्य शासनाला मिळणारा महसूल ही बंद आहे. केंद्र शासनाकडून जीएसटीची काही हजार कोटी रुपयांची रक्कम मिळणे बाकी आहे. या सर्व आर्थिक अडचणींची शासनास जाणीव आहे, म्हणूनच मर्यादा पाळून आणि जबाबदारीचे भान ठेवून व्यवहार सुरळीत करण्याचा आपला प्रयत्न आहे.माझे कुटुंब, माझी जबाबदारी... तशीच तुमचीही...राज्य शासनाने माझे कुटुंब- माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यास सुरुवात केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की, अवघा महाराष्ट्र हे माझे कुटुंब आहे, त्यात हॉटेल-रेस्टॉरंट व्यवसायिक ही आलेच. जशी माझी जबाबदारी इतरांप्रमाणे तुमच्याप्रती आहे तशीच तुमची जबाबदारी ही तुमच्या ग्राहकासाठी आणि तुमच्या रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरे