Join us

मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्याच्या मुलाची डीएनए चाचणी करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 03:05 IST

ओशिवऱ्यातील बलात्कार प्रकरणी उच्च न्यायालयाचा आदेश

मुंबई : मार्क्सवादी कम्युनिस्टचे नेते कोदियरी बालकृष्णन यांचा मुलगा बिनॉय कोदियरी याने काही आठवड्यांपूर्वी डीएनए चाचणी करण्यासाठी सत्र न्यायालयाला स्पष्ट नकार दिला होता. सोमवारी उच्च न्यायालयाने बिनॉय याला ३० जुलै रोजी डीएनए चाचणी करण्याचा आदेश दिला. एका ३३ वर्षीय महिलेने बिनॉय याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार ओशिवरा पोलीस ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदविल्याने तो रद्द करण्यासाठी बिनॉय याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

बिनॉय याने विवाहाचे आमिष दाखवून गेली कित्येक वर्षे लैंगिक शोषण केले व या संबंधांतून आपल्याला आठ वर्षांचा मुलगा आहे. बिनॉयने त्याचा विवाह झाल्याचे आपल्याला कधीच सांगितले नाही. एके दिवशी त्याच्या फेसबुक अकाउंटवर बिनॉयचा पत्नीसह फोटो पाहिल्यावर आपल्याला त्याचा विवाह झाल्याचे समजले, अशी तक्रार संबंधित महिलेने पोलिसांकडे केली.या तक्रारीमुळे आपल्याला अटक होईल, या भीतीने बिनॉयने दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला. एका महिन्यानंतर न्यायालयाने बिनॉयचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. मात्र, जामिनावर सुटल्यानंतर बिनॉयने डीएनए चाचणी करावी, अशी अट न्यायालयाने घातली. परंतु, बिनॉयने त्या अटीचे पालन केले नाही.सोमवारच्या सुनावणीत संबंधित महिलेच्या वकिलांनी सत्र न्यायालयाने घातलेली अट उच्च न्यायालयाच्या निदर्शनासही न आणता न्यायालयाने स्वत:हून बिनॉयच्या वकिलांना विचारले की, आरोपीने अद्याप डीएनए चाचणी का केली नाही? ही चाचणी करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला. तक्रारीनुसार, संबंधित महिला आणि बिनॉय यांची भेट दुबईतील एका डान्स बारमध्ये झाली. ही महिला २००८ पर्यंत डान्स बारमध्ये काम करीत होती. २०१५ पर्यंत बिनॉय तिला दरमहिना पैसे पाठवित होता. मात्र, बिनॉयचे लग्न झाले, हे समजल्यावर तिने त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा व बलात्काराचा गुन्हा नोंदविला.‘अहवाल सीलबंद लिफाफ्यात सादर करा’न्यायालयाने बिनॉय कोदियरीला मंगळवारी डीएनए चाचणी करण्याचे निर्देश दिले. तसेच डीएनए चाचणीचा अहवाल सीलबंद लिफाफ्यात सादर करण्याचे निर्देश सरकारी वकिलांना दिले.

टॅग्स :मुंबईउच्च न्यायालय