Join us

दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 05:30 IST

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ठाणे जिल्ह्यातील पडघा भागातील रहिवासी साकिबला मेंदूतील रक्तस्रावामुळे चार दिवसांपूर्वी दिल्लीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मुंबई : बंदी घातलेल्या ‘स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’चा (सिमी) माजी सदस्य आणि पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणातील आरोपी साकिब नाचन याचे शनिवारी दिल्लीच्या रुग्णालयात निधन झाले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ठाणे जिल्ह्यातील पडघा भागातील रहिवासी साकिबला मेंदूतील रक्तस्रावामुळे चार दिवसांपूर्वी दिल्लीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

एनआयएने २०२३ मध्ये दहशतवादी संघटना इसिसविरुद्धच्या देशव्यापी कारवाईचा भाग म्हणून पडघा येथे छापा टाकून साकिबसह अनेकांना अटक केली होती. साकिबला तिहार तुरुंगात ठेवण्यात आले होते आणि मंगळवारी प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. शनिवारी साकिबची प्रकृती बिघडली आणि दुपारी १२:१० वाजता त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर साकिबचा मृतदेह त्याच्या कुटुंबाकडे सोपवण्यात येईल आणि रविवारी पडघाजवळील बोरिवली गावात अंत्यसंस्कार केले जातील.

२००२-०३ मधील मुंबई बॉम्बस्फोटात होता दोषी

२००२-०३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात सहभागी असल्याबद्दल नाचनला २०१६ मध्ये दोषी ठरवण्यात आले होते. १० वर्षांची शिक्षा पूर्ण केल्यानंतर तो बाहेर आला होता. २०२३ मध्ये नाचनला एनआयएने दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.

एनआयएनुसार, नाचन हा मुख्य आरोपी आणि अटक केलेल्या गटाचा स्वयंघोषित नेता होता. आरोपींनी गावाला स्वतंत्र क्षेत्र आणि त्यांच्या राष्ट्रविरोधी कारवायांचे केंद्र म्हणून घोषित केले होते.

जूनच्या पहिल्या आठवड्यात एटीएसने बोरिवली, पडघा येथील २२ ठिकाणी शोधमोहीम राबवून नाचनच्या नातेवाइकांसह अनेक संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले. या प्रकरणात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.