Join us  

'मोदी सरकारच्या काळात दहशतवादी घुसखोरीचा उच्चांक; गृहमंत्रालयाची धक्कादायक आकडेवारी' 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 7:58 AM

दीड महिन्यापूर्वी म्हणजे ऑक्टोबरच्या अखेरीस गृहमंत्रालयाचा जो वार्षिक अहवाल जाहीर झाला तो तर आणखी धक्कादायक आहे.

मुंबई - पाकिस्तानी सैन्याकडून हिंदुस्थानात अतिरेकी घुसवण्याचे प्रयत्न दिवसेंदिवस वाढत आहेत हेच गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी सांगते. युद्धबंदीचा करार धाब्यावर बसवून पाकिस्तान रोजच सीमेवर गोळीबार करून अतिरेकी घुसवत असताना त्यावर कोणीच बोलत नाही. निर्वासितांना नागरिकत्व देण्यासाठी उन्मादाचे वातावरण निर्माण केले जात असतानाच पाकिस्तानातून होणाऱ्या घुसखोरीच्या वाढत्या घटनांकडे सरकार डोळे उघडून बघणार आहे काय? अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. 

370 कलम रद्द केल्यापासून पाकिस्तानने तब्बल 84 वेळा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न केला. सीमेवरील विविध भागांतून झालेल्या या घुसखोरीच्या माध्यमातून तब्बल 59 पाकिस्तानी अतिरेक्यांनी देशात प्रवेश केला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांनीच लोकसभेत एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्याच वतीने ही माहिती देण्यात आल्याने ती अधिकृतच म्हणावी लागेल. याचा अर्थ स्पष्ट आहे, 370 कलम रद्द केल्यानंतरही पाकिस्तानचे डोके ठिकाणावर आलेले नाही आणि सीमेवरून कश्मीर खोऱयात अतिरेकी घुसवण्याचे पाकिस्तानी उद्योग अजूनही थांबलेले नाहीत असंही शिवसेनेनं सांगितलं आहे. 

सामना संपादकीयमधील महत्त्वाचे मुद्दे 

  • शेजारच्या देशांतून येणाऱ्या निर्वासित शरणार्थींना हिंदुस्थानचे नागरिकत्व देण्याच्या मुद्द्यावरून संसदेत आणि संसदेबाहेरही गेले दोन-तीन दिवस चर्चेचे मोठेच काहूर उठले आहे. माध्यमे आणि समाजमाध्यमे या विषयावर तावातावाने रणकंदन करीत असताना पाकिस्तानातून होणाऱ्या वाढत्या घुसखोरीच्या बातमीकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष झालेले दिसते. 

  • पाकिस्तानकडून होणाऱया घुसखोरीच्या घटनांची माहितीही संसदेतच देण्यात आली. त्याविषयी चिंता करायला मात्र कोणीच तयार नाही. 
  • जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर सगळं कसं आलबेल झालं आहे, कश्मीरात कशी शांतता पसरली आहे, एकही गोळी कशी झाडली जात नाही, पाकिस्तान कसा वठणीवर आला आहे, दहशतवाद तर जवळ जवळ संपलाच आहे वगैरे वगैरे गर्जना सरकार पक्षाकडून सातत्याने होत राहिल्या. तथापि हे तमाम दावे आणि त्या गर्जना म्हणजे केवळ वल्गनाच होत्या अशी माहिती आता आकडेवारीसह पुढे आली आहे. 
  • सीमेवरील आपल्या सुरक्षा दलाचे जवान डोळय़ांत तेल घालून सरहद्दीवर पहारा देत असतात. जवानांच्या या सतर्कतेमुळेच पाकिस्तानकडून होणारे घुसखोरीचे प्रयत्न अनेकदा हाणून पाडले जातात. मात्र प्रचंड मोठी सरहद्द आणि पर्वतरांगा, नदीनाले, जंगल आणि दऱयाखोऱयांनी सगळी सीमा वेढली असल्याने घुसखोरीला कितीही अटकाव केला तरी सगळेच प्रयत्न उधळून लावणे कित्येकदा शक्य होत नाही. 

  • 2005 ते 2019 या 14 वर्षांत सुरक्षा दलाच्या जवानांनी घुसखोरीचे प्रयत्न करणाऱ्या 42 अतिरेक्यांना पकडले आणि 2 हजार 253 घुसखोरांना पुन्हा पाकिस्तानात पळून जाण्यास भाग पाडले. या 14 वर्षांत तब्बल 1110 अतिरेक्यांचा आपल्या जवानांनी खात्मा केला. 
  • ऑगस्टपासून पाकिस्तानने घुसखोरीचे जे 84 प्रयत्न केले, त्यातून 59 अतिरेकी हिंदुस्थानी हद्दीत घुसले. म्हणजे एका अर्थाने घुसखोरीचे ते प्रयत्न यशस्वी झाले असेच म्हणावे लागेल. हे 59 अतिरेकी कश्मीर खोऱयातच दबा धरून बसले आहेत की राजधानी दिल्लीसह देशाच्या अन्य भागांत कुठे पोहोचले आहेत हे कळावयास मार्ग नाही. 
  • दीड महिन्यापूर्वी म्हणजे ऑक्टोबरच्या अखेरीस गृहमंत्रालयाचा जो वार्षिक अहवाल जाहीर झाला तो तर आणखी धक्कादायक आहे. या अहवालानुसार 2018 या वर्षात पाकिस्तानी अतिरेक्यांनी हिंदुस्थानात घुसखोरी करण्याचे 328 प्रयत्न केले. यापैकी घुसखोरीचे तब्बल 143 प्रयत्न यशस्वी झाले. 
  • 2014 ते 2019 या पाच वर्षांतील घुसखोरीचा हा उच्चांक होता. 2018 या एकाच वर्षात 257 अतिरेकी जम्मू-कश्मीरात मारले गेले आणि अतिरेक्यांच्या चकमकींमध्ये आपले 91 जवान शहीद झाले. 2017 मध्ये घुसखोरीच्या 419 प्रयत्नांपैकी 136 प्रयत्न यशस्वी झाल़े 2016 मध्ये 371 पैकी 119, 2015 मध्ये 121 प्रयत्नांपैकी 33, तर 2014 मध्ये घुसखोरीच्या 222 प्रयत्नांपैकी 65 प्रयत्न यशस्वी ठरले होते.  
टॅग्स :दहशतवादीपाकिस्तानभारतगृह मंत्रालयशिवसेना