बॅनर फाडल्याने उरणमध्ये तणाव
By Admin | Updated: November 4, 2014 00:33 IST2014-11-04T00:33:58+5:302014-11-04T00:33:58+5:30
शिवसेना आमदार मनोहर भोईर यांचे अभिनंदन करणारा बॅनर फाडल्यावरून शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उरणमध्ये हाणामारी झाली.

बॅनर फाडल्याने उरणमध्ये तणाव
चिरनेर : शिवसेना आमदार मनोहर भोईर यांचे अभिनंदन करणारा बॅनर फाडल्यावरून शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उरणमध्ये हाणामारी झाली. या प्रकरणी उरण पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या २४ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे या झटापटीत एका शिवसैनिकाला त्याच्या लहान मुलीसमोरच बेदम मारहाण केल्याने या मुलीला मानसिक धक्का बसला आहे.
चिरनेर गावाच्या वेशीवर आमदार मनोहर भोईर यांचे अभिनंदन करणारा बॅनर शिवसैनिकांनी लावला होता. हा बॅनर कोणीतरी फाडला, याबाबत शिवसैनिकांकडून बॅनर फाडणाऱ्यांविरोधात शिवीगाळ चालू होती. ती आपल्यालाच केली जात असल्याचे समजून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला. यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले.
दुसऱ्या दिवशी वृत्तपत्र आणायला नाक्यावर आपल्या मुलीसहीत गेलेल्या शिवसैनिकाला आधीच दबा धरून बसलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी बेदम मारल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. तर शिवसैनिकच काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घरात घुसून पूर्ण कुटूंबाला मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसच्यावतीने दिलेल्या फिर्यादीत केला.
उरण पोलिसांनी या दोन्ही प्रकरणाबाबत शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गावात दंगल घडविल्या प्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी काही कार्यकर्त्यांना अटक केली असून धरपकड सुरूच असल्याची माहिती उरण पोलिसांनी दिली. (वार्ताहर)