‘भावनांक चाचणीत ‘ताण’च गायब
By Admin | Updated: May 18, 2015 05:15 IST2015-05-18T05:15:36+5:302015-05-18T05:15:36+5:30
वाकोला गोळीबार प्रकरणानंतर मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्थितीची तपासणी करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने

‘भावनांक चाचणीत ‘ताण’च गायब
मनीषा म्हात्रे, मुंबई
वाकोला गोळीबार प्रकरणानंतर मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्थितीची तपासणी करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने सुरू करण्यात आलेल्या भावनांक तपासणीच्या उपक्रमाबाबत पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. भावनांक तपासणीत ताणाची भावना मांडण्याबाबत जागाच नसल्याने प्रश्नावलीतील ४८ प्रश्नांची उत्तरे सर्व कर्मचाऱ्यांनी अवघ्या १० ते १५ मिनिटांत भरून अन्य कार्यालयीन कामाप्रमाणेच हेसुद्धा काम असल्याच्या भावनेतून हा उपक्रम ‘उरकून’ टाकला.
आमच्यावरील ताण जाणून घेण्यासाठी प्रश्नावलीत जागा असेल, अशी अपेक्षा होती. मात्र भरून घेण्यात आलेल्या प्रश्नावलीतील प्रश्नांमधून व्यक्त होण्याची संधीच मिळाली नसल्याने आमचा भ्रमनिरास झाला, अशी प्रतिक्रिया पोलीस शिपायापासून पोलीस निरीक्षकांपर्यंत व्यक्त होत आहे.
वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक दिलीप शिर्के यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जोशी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करीत स्वत: आत्महत्या केली होती. या घटनेनंतर पोलिसांवर असलेल्या मानसिक ताणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याने मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या सर्वांची मानसिक
तपासणी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दिले होते. आठवडाभरापासून शहरातील
आणि प्रादेशिक कार्यालये, गुन्हे शाखा कक्ष, कार्यालयांत भावनांक तपासणीचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
४८ प्रश्नांचा समावेश असलेल्या या प्रश्नावलीचे तीन सेट आहेत. यात होय किंवा नाही, तसेच चार पर्याय असलेल्या उत्तरांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहायक पोलीस आयुक्त यांच्या देखरेखीखाली सर्व कर्मचाऱ्यांनी या प्रश्नावलीत उत्तरे भरून दिली.
भरलेल्या प्रश्नावलींचे गठ्ठे सीलबंद करून अतिरिक्त आयुक्त गुन्हे यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. या प्रश्नावलीतून पोलिसांवरील ताणाची पातळी समजू शकेल. प्रश्नावली मानसोपचार तज्ज्ञांकडून तपासण्यात येणार आहे. त्यातून पोलिसांच्या मानसिकतेची वस्तुस्थिती स्पष्ट होईल, अशी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची अपेक्षा आहे.
तपासणीनंतर मानसिक उपचाराची आवश्यकता असलेल्यांना मार्गदर्शन, समुपदेशन आणि उपचार करण्यात येणार आहेत. प्रश्नावलीतील एकेरी प्रश्नांमधून ताण, त्रास, झोप, व्यसन, लैंगिक समस्या अशी सांख्यिकी आकडेवारी गोळा होणार आहे. पोलिसांवरील ताण तपासण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांनी पोलिसांना थेट प्रश्न विचारण्याची आवश्यकता होती, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.