Join us

देवनारचा कचरा हटवण्याच्या निविदा प्रक्रियेला मुदतवाढ; इच्छुकांना २३ जूनपर्यंत अर्जाची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 14:20 IST

स्पर्धा होणार तीव्र

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: देवनार डम्पिंगमधील अनेक वर्षांपासून साचलेले कचऱ्याचे डोंगर साफ करण्यासाठी महापालिकेने मागविलेल्या निविदा भरण्याकरिता तब्बल २१ कंपन्यांनी स्वारस्य दाखविले आहे. पालिकेने या कामाच्या निविदा भरण्यासाठी २३ जूनपर्यंत मुदतवाढ दिली असून त्यामुळे कंत्राट मिळविण्यासाठी आणखी स्पर्धा वाढणार आहे.

देवनार डम्पिंगची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्यासाठी या जागेत अनेक वर्षांपासून साचलेले कचऱ्याचे डोंगर हटवून जमीन रिकामी करण्याचे आदेश राज्य सरकारने महापालिकेला दिले आहेत. येथील कचऱ्यावर बायोरेमिडिएशन प्रक्रिया करून येत्या ३ वर्षांत हा कचरा हटविण्यात येणार आहे. ११० हेक्टर जमिनीवरील तब्बल १८५ लाख टन कचऱ्यावर ही प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी २ हजार ३६८ कोटी रुपयांच्या कंत्राटाची प्रक्रिया पालिकेकडून सुरू करण्यात आली आहे.

४० मीटर उंचीचे कचऱ्याचे ढीग

देवनार डम्पिंगवरील ४० मीटर उंचीच्या कचऱ्याच्या ढिगांचे खोदकाम यांत्रिक पद्धतीने करणे, वैज्ञानिक पद्धतीने कचऱ्याचे उत्सर्जन, हवेचे प्रदूषण, भूजल प्रदूषण इत्यादी पर्यावरणीय धोक्यांचे निरीक्षण करणे आणि घनकचरा अधिनियम २०१६ आणि केंद्रीय पर्यावरण प्रदूषण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे अशा कामांचा यात समावेश आहे.

विविध कंपन्या इच्छुक

मुलुंड कचराभूमी सफाई करणारी कंत्राटदार कंपनी, देवनार येथील कचऱ्यापासून वीजनिर्मितीचे कंत्राट दिलेली कंपनी अशा अनेक कंपन्या त्यासाठी या स्पर्धेत पुढे आल्या आहेत. चेन्नई, हैदराबाद येथे कचरा विल्हेवाटीचे काम केलेल्या कंपन्याही त्यासाठी इच्छुक आहेत. त्यापैकी किती कंपन्या प्रत्यक्षात निविदा भरतील, किती कंपन्या पात्र होतील ते प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समोर येणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिये वेग येईल.

  • एकूण कचरा प्रक्रिया: अंदाजे २,३०० मेट्रिक टन /दिवस
  • वाहनांची संख्या: अंदाजे १,२०० /दिवस 
  • प्रकल्पाची किंमत: रु. २,३८६ कोटी
टॅग्स :मुंबईकचरामुंबई महानगरपालिका