ठेकेदार मिळविण्यासाठी निविदेत अखेर बदल
By Admin | Updated: February 13, 2015 22:43 IST2015-02-13T22:43:29+5:302015-02-13T22:43:29+5:30
नव्याने दाखल होणाऱ्या २३० पैकी १९० बसेससाठी कंत्राटी स्वरूपात वाहक घेण्याचा निर्णय ठाणे परिवहन सेवेने घेतला आहे

ठेकेदार मिळविण्यासाठी निविदेत अखेर बदल
ठाणे : नव्याने दाखल होणाऱ्या २३० पैकी १९० बसेससाठी कंत्राटी स्वरूपात वाहक घेण्याचा निर्णय ठाणे परिवहन सेवेने घेतला आहे. तसेच या बसेसवर मालकी परिवहनची राहणार असली तरी चालक आणि या बसची निगा देखभाल करण्यासाठी ठेकेदार शोधण्यात येत आहे. यासंदर्भात परिवहनने निविदा काढल्या होत्या. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर फेरनिवदा काढण्याचा प्रस्ताव परिवहनच्या विशेष समितीने मंजूर केला आहे.
ठाणे परिवहन सेवेत जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत २३० बसेस घेण्यात येत आहेत. त्यातील १५ व्होल्व्हो बसेस दाखल झाल्या असून उर्वरित १५ बसेस मुल्लाबाग येथील आगाराचे काम पूर्ण झाल्यानंतर दाखल होणार आहेत. उर्वरित १९० बसेससाठीदेखील खाजगी ठेकेदार नेमला जाणार आहे. प्रति किमी तत्त्वावर या बसेसवर परिवहनची मालकी असणार असून परिवहन संबंधित ठेकेदाराला आगार उपलब्ध करून देणार आहे. परंतु, त्या बसेसवर चालक त्याचेच असणार असून बसेसची १० वर्षांसाठी निगा देखभालही संबंधित ठेकेदारालाच करावी लागणार आहे. परंतु, यासंदर्भात निविदा काढून तिला तीन वेळा मुदतवाढ देऊनही एकही ठेकेदार पुढे आला नाही. त्यामुळे आता परिवहनने यातील काही अटी आणि शर्ती शिथिल केल्या असून नव्याने फेरनिविदा काढली आहे.
बस खरेदी किमतीच्या ५ टक्के सुरक्षा अनामत रक्कम म्हणजेच ४ कोटी ९१ लाख इतकी करण्यात आली असून ही रक्कम बँक गॅरंटी स्वरूपात असेल. पूर्वीच्या निविदेनुसार अपफ्रंट कॉन्ट्रीब्युशनची रक्कम बस खरेदी रकमेच्या जास्तीतजास्त १५ टक्के याप्रमाणे १९ कोटींच्या घरात होती. परंतु, आता ती रक्कम ४ कोटी ९१ लाख असून ती डिमांड ड्राफ्ट स्वरूपात असेल. व्हॅट रजिस्ट्रेशनची अट वगळून पात्रतेसाठी केवळ तीनपैकी एकच बाब महत्त्वाची मानली जाणार असून यामध्ये स्वत:च्या मालकीच्या ७० बसेस असणे, शासकीय उपक्रमातील १०० बसेसच्या आॅपरेशन अॅण्ड मेंटेनन्सचा २ वर्षांचा अनुभव तसेच २०० बसेसचा ३ वर्षांचा मेंटेनन्सचा अनुभव यापैकी एक अट पूर्ण असणे आवश्यक असणार आहे.