Join us  

कॉन्स्टेबलच्या आंतर जिल्हा बदलीसाठी दहा वर्षांची अट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 2:29 AM

मुंबईतील २१९ जणांचे प्रस्ताव मंजूर : तितकेच अडकले प्रतीक्षा यादीत

मुंबई : महानगरात कार्यरत असलेल्या २१९ पोलीस अंमलदारांना अखेर आपल्या मूळ गावी व इच्छेच्या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत असलेल्या त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. मात्र, मुंबई पोलीस दलात किमान दहा वर्षे सेवा पूर्ण झाली आहे, त्यांच्याच आंतर जिल्हा बदलीच्या प्रस्तावावर विचार करण्यात आला आहे.

मुंबई पोलीस दलात विविध ठिकाणी कार्यरत २१९ पोलिसांच्या आंतर जिल्हा बदलीला पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी मान्यता दिली आहे. त्यांना सोडण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलात किमान दहा वर्षे सेवा पूर्ण झाली आहे, त्यांच्याच प्रस्तावावर विचार करण्यात आला आहे. त्यामुळे ही अट पूर्ण न केलेल्यांचे अर्ज प्रलंबित ठेवण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.राज्यातील अन्य आयुक्तालय व अधीक्षक कार्यालयाच्या तुलनेत मुंबई पोलीस दलात अंमलदारांचे प्रमाण कैकपटीने अधिक आहे. या ठिकाणी पोलीस भरतीत अधिक जागा असल्याने ग्रामीण भागातील तरुण-तरुणी सहभागी होत असतात. मात्र गावी वृद्ध आईवडील एकटेच असल्याने त्यांच्याकडे लक्ष देता येत नाही; किंवा पत्नीला तिकडे नोकरी असल्यास त्यांचे कौटुंबिक व मानसिक स्वास्थ्य बिघडते. त्यामुळे राज्य सरकारने २०११ च्या भरतीपासून लागू केलेली आंतरजिल्हा बदली रद्दची अट दोन वर्षांपूर्वी शिथिल करण्यात आली. त्यानंतर अनेक इच्छुकांनी आपल्या मूळ जिल्ह्यात बदलीसाठीचे प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविले होते. मात्र त्यांचे प्रमाण अधिक असल्याने दहा वर्षे सेवा पूर्ण किंवा दोन युनिटमध्ये कार्यकाळ पूर्ण केलेल्या पोलिसांना आंतर जिल्हा बदलीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे.‘काही कालावधीनंतर निर्णय घेणार’मुंबई पोलीस दलात किमान दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या २१९ कॉन्स्टेबलचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून ते संबंधित आयुक्त/ अधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहेत. मात्र २२७ इच्छुकांची १० वर्षांची सेवा पूर्ण न झाल्याने त्यांचे प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. काही काळानंतर त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :मुंबईपोलिस