स्मार्ट कार्डला रेल्वेचा तात्पुरता विराम
By Admin | Updated: July 16, 2016 02:13 IST2016-07-16T02:13:47+5:302016-07-16T02:13:47+5:30
स्थानकांवरील तिकीट खिडक्यांच्या रांगेतून प्रवाशांची सुटका करण्याचा निर्णय घेत आणि एटीव्हीएम तसेच जेटीबीएसला पर्याय म्हणून कॅश कॉईन आॅपरेटेड मशिन (सीओ-एटीव्हीएम) मुंबई उपनगरीय

स्मार्ट कार्डला रेल्वेचा तात्पुरता विराम
मुंबई : स्थानकांवरील तिकीट खिडक्यांच्या रांगेतून प्रवाशांची सुटका करण्याचा निर्णय घेत आणि एटीव्हीएम तसेच जेटीबीएसला पर्याय म्हणून कॅश कॉईन आॅपरेटेड मशिन (सीओ-एटीव्हीएम) मुंबई उपनगरीय स्थानकांवर बसविण्यात आल्या. या यंत्राला प्रवाशांकडून जरी चांगला प्रतिसाद मिळत असला तरी स्मार्ट कार्डमधून तिकीट काढण्यासाठी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त तिकिटे काढली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रेल्वेकडून या मशिनमधून स्मार्ट कार्डद्वारे तिकिटे काढण्याची सुविधा काही महिन्यांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅश टाकून तिकीट मात्र मिळविता येईल.
९ आॅक्टोबर २0१५ रोजी मध्य रेल्वेच्या सीएसटी येथे मोबाइल तिकीट सेवेबरोबरच सीओ-एटीव्हीएमचाही शुभारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आला. रेल्वेच्या क्रिस या संस्थेमार्फत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ही सुविधा सुरू करण्यात आली. या मशिनमध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी विना सवलतींचे दुसऱ्या श्रेणीचे तिकीट व उपनगरीय गाड्यांसाठी दुसऱ्या व प्रथम श्रेणीचे तिकीट तसेच रीटर्न तिकीट मिळतानाच स्मार्ट कार्डद्वारे तिकीट काढण्याची सोय आहे. ही मशिन ५ आणि १0 रुपयांची नाणी तसेच ५ ते एक हजार रुपयांपर्यंतच्या महात्मा गांधीजींच्या सिरीजमधील नोटाच स्वीकारते. या सेवेला प्रतिसादही मिळत आहे. मात्र स्मार्ट कार्डद्वारे तिकीट काढताना गैरप्रकार होत असल्याचे समोर आले आहे.(प्रतिनिधी)