अवकाळी नुकसान; सर्वेक्षणास गती नाही
By Admin | Updated: March 7, 2015 22:34 IST2015-03-07T22:34:08+5:302015-03-07T22:34:08+5:30
ठाणे व पालघर जिल्ह्यात सुमारे तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे ७१० हेक्टरवरील आंब्यांच्या बागांसह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अवकाळी नुकसान; सर्वेक्षणास गती नाही
ठाणे: ठाणे व पालघर जिल्ह्यात सुमारे तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे ७१० हेक्टरवरील आंब्यांच्या बागांसह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुमारे आठ दिवस उलटलेले असतानाही या नुकसान सर्वेक्षणाने दोन्ही जिल्ह्यात अद्याप गती पकडलेली नाही. यासाठी महसूल विभागासह पुनर्वसन खात्याने या कामी तातडीने लक्ष देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
शेती नुकसानीचे सर्वेक्षण अहवाल तातडीने करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. मात्र ठाणे व पालघरच्य जिल्हा प्रशासनाकडून अद्यापही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. नुकसानीचा अहवाल करण्यासाठी बहुतांशी ठिकाणी प्रशासनाचा प्रतिनिधी अद्यापही न गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शासनाने दिलेल्या आदेशानुसार वेळीच सर्वेक्षण होणे अपेक्षित असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
अवकाळी पावसाने झालेले नुकसान ५० टक्केच्या आत आहे किंवा कसे, असा अहवाल पुनर्वसन व महसूल विभागाने काळजीने करणे आवश्यक आहे. राज्य शासनाकडून या अहवालास विचारात घेतले जाते. स्थानिक पातळीवर ग्राम सेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यक यांच्याकडून शेतीच्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू असल्याचा दावा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाव्दारे केला जात आहे.
राज्य शासनास दिल्या जाणारा अहवाल जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या स्वाक्षरीने दिला जातो. पण तत्पूर्वी तालुका पातळीवरून तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून जिल्हा पातळीवर अहवाल येणे अपेक्षीत आहे. पण त्यास विलंब होत असल्याचे चौकशी अंती उघड झाले आहे. ठाणे, पालघर या दोन्ही जिल्ह्यातील सुमारे ७१० हेक्टर क्षेत्रातील आंब्यांच्या बागाना या अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. तर वाल, हरबरा, या कडधान्यासह काही प्रमाणात भेंडी, मिरची, गवार आदी भाजीपाल्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचा प्राथमिक आंदाज आहे. (प्रतिनिधी)