Join us

मुंबईला उष्माघाताचा धोका; तापमानाचा पारा चाळीशीपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 11:04 IST

महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : मागच्या काही दिवसांत आसपासच्या परिसरातील तापमानाची वाढ झपाट्याने झाल्यामुळे उष्यापासून बचाव करण्यासाठी जाणीवपूर्वक काही बाबींचे पालन करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे. तापमान वाढल्यामुळे शरीराला थकवा येऊ शकतो, एखाद्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान वाढल्यास उष्माघाताचाही त्रास होऊ शकतो. उष्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काय करावे, काय करू नये, याबाबत पालिकेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

वाढत्या तापमानामुळे उद्भवणारी मोठी समस्या म्हणजे उष्माघात. यामुळे रक्तदाब कमी होतो व मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. हा गंभीर आजार असून, त्यास त्वरित वैद्यकीय उपचारांची गरज असते. उन्हामुळे त्वचेचा शुष्कपणा, वाढलेले घामाचे प्रमाण व धूळ यामुळे त्वचेवर घामोळ्या व फोडाची समस्याही वाढते. उन्हाळ्यात आपल्या पायांना, अंगठा व बोटे यांना त्वचेच्या रुक्षतेमुळे व धुळीमुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो.

आहाराकडे लक्ष द्या

उन्हाळ्यात आहारात संतुलन आवश्यक आहे. पुरेसे पाणी प्या. 

घसा कोरडा पडतो म्हणून अति थंडगार पाणी पिऊ नये. 

उन्हाळ्यात अन्न पचायला जड असते म्हणून भुकेपेक्षा एक घास कमीच खावा. 

कैरी पन्हे, कोकम सरबत हे उष्णता कमी करतात व शरीर शीतल ठेवतात. दही, ताक व लस्सी हेही लाभकारक ठरतात.

मसाल्याचे अन्नपदार्थ कमी खावेत. शिवाय धणे, जिऱ्याचे पाणी प्यायल्यास पचनशक्ती वाढवून शरीराला थंडपणा आणतात.

या घरगुती उपायांवर भर द्या

उन्हाळ्यात घामोळ्यांचा त्रास टाळण्यासाठी थंड पाण्याने आंघोळ करावी. पातळ व सैलसर कपडे घालावेत. 

 जंतुसंसर्ग टाळण्यासाठी बाहेरून आल्यानंतर पाय चांगले धुवावेत व आवश्यक असल्यास त्वचा मुलायम ठेवणारे मलम लावावे. 

उन्हाळ्यात आपली त्वचा जपणे फार महत्त्वाचे ठरते. म्हणून उन्हात बाहेर जाताना शरीरावर सनस्क्रीन लोशन लावावे. 

शक्यतो आहारात संत्री, मोसंबी यासारखी फळे, हिरव्या पालेभाज्या, गाजर, शेंगदाणे व तृणधान्ये यांचा समावेश असावा.

त्वचेच्या रूक्षतेमुळे व धुळीमुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता

 निथळणाऱ्या घामामुळे शरीरातील पाणी सतत बाहेर जात असते. त्यामुळे अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर, मळमळ, पायात पेटके येणे सहज शक्य आहे. उन्हाळ्यात आपल्या पायांना, मुख्यत्वे अंगठा व बोटे यांना त्वचेच्या रुक्षतेमुळे व धुळीमुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो.

टॅग्स :मुंबईतापमानमुंबई महानगरपालिका