मुंबई : शहरी नक्षलवाद आणि कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांची तात्पुरती जामिनावर सुटका करण्यास विशेष एनआयए न्यायालयाने शनिवारी नकार दिला. तेलतुंबडे यांना ८ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, आनंद तेलतुंबडे १४ एप्रिल रोजी विशेष न्यायालयात शरण गेले. त्यानंतर एनआयएने तेलतुंबडे यांना अटक केली. त्यावेळी विशेष न्यायालयाने त्यांना आठवडाभराची एनआयए कोठडी सुनावली. ही मुदत संपल्यानंतर तेलतुंबडे यांना शनिवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. डी. ई. कोथळीकर त्यांनी तेलतुंबडे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तेलतुंबडे यांनी तात्पुरती जामिनावर सुटका करावी, अशी विनंती करणारा अर्ज विशेष न्यायालयात शनिवारी दाखल केला. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर तेलतुंबडे यांना कारागृहातच वैद्यकीय सेवा मिळावी, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात रविवारपर्यंत कारागृह प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश देत विशेष न्यायालयाने त्याबाबत तातडीची सुनावणी ठेवली आहे.
तेलतुंबडे यांना तात्पुरता जामीन नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 05:25 IST