Join us
Daily Top 2Weekly Top 5

सांगा एकदाचं! रेल्वे स्थानकावरची डागडुजी, सुशोभीकरणाची कामं संपणार कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 10:05 IST

मध्य, हार्बर मार्गाच्या तुलनेत पश्चिम रेल्वे मार्गावर काही प्रमाणात सुविधा असल्या, तरी पिण्याच्या पाण्याची गैरसोय, अर्धवट छप्पर, अस्वच्छता आणि बेकायदा पार्किंग यांसारख्या मूलभूत समस्या कायम आहेत.

मुंबई : रेल्वे स्थानकांवर पावसाळ्यात सुरू झालेली डागडुजी व सुशोभीकरणाची कामे हिवाळ्यापर्यंत पूर्ण होतील आणि प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात उन्हाळा तोंडावर आला तरी ही कामे सुरूच असल्याने ती कधी पूर्ण होणार, असा परखड सवाल प्रवासी रेल्वे प्रशासनाला विचारत आहेत.

मध्य, हार्बर मार्गाच्या तुलनेत पश्चिम रेल्वे मार्गावर काही प्रमाणात सुविधा असल्या, तरी पिण्याच्या पाण्याची गैरसोय, अर्धवट छप्पर, अस्वच्छता आणि बेकायदा पार्किंग यांसारख्या मूलभूत समस्या कायम आहेत.

सांताक्रुझ स्थानकातील फलाट क्रमांक ३ वर विरार दिशेकडील फलाटावर शेवटपर्यंत छप्पर नाही. प्रवाशांना अल्प दरांत थंड पाणी मिळावे, यासाठी काही महिन्यांपूर्वी सुरू केलेला स्टॉल सध्या बंद आहे. शेजारील पाणपोईची अवस्थाही दयनीय आहे. स्वच्छतेअभावी प्रवासी पाणी पिण्यास टाळाटाळ करतात.

स्थानकावरील स्कायवॉक आणि जिन्यांवरही पुरेशी स्वच्छता नाही. पूर्वेला तिकीट घराशेजारील बेस्टच्या थांब्यालगत मोठ्या प्रमाणावर दुचाकी आणि सायकली बेकायदा उभ्या केल्या जातात. काही वेळा तिकीट घराच्या अगदी बाजूलाच वाहनांची गर्दी दिसून येते.

सुशोभीकरणाच्या नावाखाली महिनोंमहिने कामे

सांताक्रुझ, वांद्रे, प्रभादेवीपुरतेच प्रश्न मर्यादित नाहीत. इतर अनेक स्थानकांतही सुशोभीकरणाच्या नावाखाली कामे महिनोनमहिने सुरू आहेत. मात्र, या कामांदरम्यान सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत आहे. रखडलेल्या कामांमुळे आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांना दररोज गैरसोयीचा सामना करावा लागत असून, रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

सर्वत्र पिचकाऱ्यांचे डाग, झोपड्यांमुळे अवकळा

वांद्रे स्थानकातील पश्चिमेकडील भाग तुलनेने सुस्थितीत असला, तरी पूर्वेकडे मात्र मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आहे. जिने, प्रवेश मार्गांवर पान, मावा, गुटख्याच्या पिचकाऱ्यांचे डाग सर्वत्र दिसतात.

 स्थानकालगतच्या झोपड्यांमुळे परिसर विद्रूप झाला आहे. नव्याने जोडलेल्या स्कायवॉकमुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी पूर्वेकडील परिस्थिती प्रवाशांसाठी त्रासदायक आहे. फलाट क्रमांक एक वगळता दोन आणि तीनवर अनेकदा अस्वच्छता असते.

स्वच्छता करूनही फलाटांवर धूळ आणि मातीचा थर कायम पाहायला मिळतो. पाणपोईतील पाणी पिण्यायोग्य नसल्याने बाटलीबंद पाणी खरेदीशिवाय पर्याय नसल्याचे प्रवासी सांगतात. प्रभादेवी स्थानकातही पुरेशी स्वच्छता नसल्याची तक्रार आहे. पाणपोई स्वच्छ नसल्याने प्रवासी तेथे जात नाहीत.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Commuters Ask: When Will Station Work Finally Finish?

Web Summary : Mumbai commuters are frustrated as station repairs and beautification drag on, missing deadlines. Basic issues like uncleanliness, lack of water, and illegal parking persist at Bandra, Santacruz, and Prabhadevi stations, causing daily inconvenience.