Join us

उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे

By मनोहर कुंभेजकर | Updated: May 13, 2025 10:33 IST

Tejashwi Ghosalkar Resigns: घोसळकर यांनी आपण महिला - दहिसर विधानसभा प्रमुख या पदावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गट शिवसेनेला मोठे हादरे बसू लागले आहेत. काही दिवसांपू्र्वीच माजी महापौर दत्ता दळवी यांनी शिंदे गटाची वाट धरल्यानंतर आता माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदांचा राजीनामा दिला आहे. यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. 

घोसळकर यांनी आपण महिला - दहिसर विधानसभा प्रमुख या पदावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. तसेच यासाठी त्यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. पक्षाच्या कार्यपद्धतीशी एकनिष्ठ राहून कार्य करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी पक्षप्रमुख व आपले मन:पूर्वक आभार मानते, असे त्यांनी राजीनाम्यात म्हटले आहे. 

दरम्यान, प्रभाग क्रमांक १ च्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी सोमवारी रात्री आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्धव सेनेचे उपनेते आणि माजी आमदार डॉ.विनोद घोसाळकर यांच्या बरोबर तेजस्वी घोसाळकर यांना आज दुपारी १२ वाजता मातोश्रीवर बोलावले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

लोकसभा निवडणुकीत कमालीचे यश मिळविल्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने ठाकरेंच्या शिवसेनेची दाणादाण उडविली होती. मुंबईतच मोठा फटका बसल्याने ठाकरेंना महापालिका निवडणुकीत मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. गेल्याच महिन्यात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत जाण्याची चर्चा सुरु केली होती. परंतू, शिंदे गटाने राज ठाकरेंच्या भेटीगाठी वाढविल्याने आता राज ठाकरे शिंदेंसोबत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशातच माजी आमदार, माजी महापौर, नगरसेवकही आता भाजप, शिवसेनेची वाट धरू लागल्याने ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनामुंबईमुंबई महापालिका निवडणूक २०२२