तंत्रज्ञानाच्या प्रदर्शनांनी तरुणाई थक्क!

By Admin | Updated: January 6, 2015 00:59 IST2015-01-06T00:59:55+5:302015-01-06T00:59:55+5:30

आयआयटीचा ‘टेकफेस्ट’ यंदा धूमधडाक्यात गाजला. तीन दिवस चाललेल्या या टेकफेस्टला १ लाख ४५ हजारांहून अधिक टेक्नोप्रेमींनी भेट दिली.

Technology expands in youth! | तंत्रज्ञानाच्या प्रदर्शनांनी तरुणाई थक्क!

तंत्रज्ञानाच्या प्रदर्शनांनी तरुणाई थक्क!

मुंबई : आयआयटीचा ‘टेकफेस्ट’ यंदा धूमधडाक्यात गाजला. तीन दिवस चाललेल्या या टेकफेस्टला
१ लाख ४५ हजारांहून अधिक टेक्नोप्रेमींनी भेट दिली. तंत्रज्ञानाची भरगच्च माहिती व अचंबित करणाऱ्या विविध तंत्र आणि रोबोंची माहिती थक्क करणारी होती. आंतरराष्ट्रीय व भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या रोबो आणि इतर तंत्रज्ञानाच्या प्रदर्शनाला विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी मोठी गर्दी केली.
विशेष बाब म्हणजे आपल्या कल्पनेपलीकडचे तंत्रज्ञान आता सर्वसामान्यांना परवडेल असे झाले असल्याचे यात निदर्शनास आले. टेकफेस्टमधील रोबोज् लोकांच्या गरजा लक्षात घेऊन हाताळण्यास सोप्पे आणि किमतीने कमी असे तयार करण्यात आले होते.
टेक्नोफेस्टमध्ये लक्षवेधी ठरला तो फ्रान्सच्या भारतीय दूतावासातील विज्ञान विभागाने तयार केलेला ‘इनमुव्ह’ रोबोट. माणसाच्या आकाराएवढा हा रोबो अत्यंत स्वस्त आणि कोणीही तयार करू शकेल असाच आहे. या रोबोचे वैशिष्ट्य म्हणजे थ्रीडी प्रिंटने हा तयार केला आहे व तो मनुष्याचा हालचालींना प्रत्युत्तर देतो; तसेच त्यांच्याशी संवादही साधतो. असा हा ओपन सोर्स थ्रीडी प्रिंटेड लाइफ - साइज रोबो रोबोप्रेमींना भुरळ घालणारा ठरला.
टेकफेस्टच्या मुख्य आकर्षणांमध्ये ‘बायोनिक हॅण्ड’ होते. फ्रान्सच्या भारतीय दूतावासातील विज्ञान विभागाने हा जैविक हात तयार केला. या हाताचे वैशिष्ट्य म्हणजे हा हात नैसर्गिक हाताप्रमाणेच हालचाल करतो; शिवाय या जैविक हाताला संवेदनाही होतात. याचा उपयोग हाताने अधू असलेल्या व्यक्तींसाठी विशेष होणार आहे. तसेच रास्त दरात हा उपलब्ध होऊ शकतो, असे या विद्यार्थ्यांनी सांगितले. येथे मनोरंजनासाठी म्हणून फूटबॉल खेळणारे रोबोसुद्धा तयार करण्यात आले होते. याची किंमतही ५५ फ्रॅन्क म्हणजेच ३ हजार ४६२ ठेवण्यात आली होती. असे स्वस्त रोबो खरेदी करण्याकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी हा ‘सॉकर रोबो’ तयार करण्यात आला आहे, असे येथील विद्यार्थ्याने सांगितले. एखादा रोबो किंवा इन्स्टॉलेशन तयार करताना आर्थिक काटकसर करण्यासाठी विद्यार्थ्यांचा स्वस्त प्रॉडक्ट वापरण्याकडे कल दिसून आला. त्यामुळे सामान्यांना परवडतील अशा किमतीत ते आणण्याकडे विद्यार्थ्यांचा कल होता. रोजच्या वापरातले हे तंत्रज्ञान सामान्यांना परवडणारे असे असायला पाहिजे, असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. (प्रतिनिधी)

मी पवईच्या आयआयटीला पहिल्या दिवशी भेट दिली. येथे आल्यावर तेथील एकूण वातावरणाने भारावलो आणि प्रदर्शने पाहून तर थक्कच झालो. वेगवेगळ्या प्रकारचे लहान-मोठे रोबो पाहून तंत्रज्ञानाच्या आविष्काराची झलकच अनुभवता आली.
- मकरंद केसरकर, लालबाग

आयआयटीच्या ‘रोबो वॉर’विषयी मी ऐकून होते. विशेषकरून या रोबो वॉरसाठीच यंदा तेथे गेले. यात पुण्याच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘झिअस’ रोबोने मलेशियन रोबोवर मात केली. हे युद्ध स्वत:च्या डोळ्यांनी पाहताना मला स्वत:वर विश्वास बसत नव्हता. खरोखरच आयआयटीचा टेकफेस्ट इतर टेक्नोफेस्टपेक्षा वेगळा का आहे ते येथे आल्यावरच समजले. - चैत्राली भारती, कल्याण

विज्ञान आणि आकर्षण यांची अनोखी सांगड अनुभवण्याची संधी यंदाच्या टेकफेस्टमध्ये मिळाली. आयआयटीत मांडलेली विविध मॉडेल्स पाहून विज्ञानही कलात्मक असू शकते याचा अंदाज या वेळी मला आला.
- सायली पाटील, दादर

रोबोंंच्या दुनियेचा अनोखा अनुभव या टेकफेस्टमध्ये अनुभवयास मिळाला. त्यातही महत्त्वाचे म्हणजे रोबो म्हणजे नक्की काय आणि त्यामागे असलेल्या तंत्रज्ञानाची माहिती यामध्ये मिळाली.
- श्रीकांत पोटफोडे, भांडुप

सर्वांत आकर्षणाचा आणि आवडीचा भाग ठरला तो ‘रोबो वॉर’चा रोमांंचकारी थरार. रोबोमध्ये सुरू असलेले युद्ध, त्यामागे लपलेले विज्ञान यांचा अनोखा ताळमेळ यातून दिसून आला.
- संयुक्ता आंबेरकर, वरळी

 

Web Title: Technology expands in youth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.