Join us

फूल विक्रेत्यांच्या अश्रूंची झाली फुले...

By सीमा महांगडे | Updated: October 25, 2023 12:26 IST

वर्षभर कष्ट करून पिकवलेल्या फुलांना भाव नसल्याने फूल विक्रेत्यांच्या अश्रूंची फुलेच झाली.

सीमा महांगडे / दत्ता खेडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :  दादरच्या बाजाराची ओळखच होते ती फूल बाजार म्हणून. सकाळी चारच्या सुमारास दादर स्थानकाबाहेर लगबग सुरू होऊन फुलांनी गच्च भरलेले मोठमोठे ट्रक-टेम्पो पहाटे दादरच्या बाजारात जमा होतात. यावर्षी मात्र फुलांना भाव मिळत नसल्याने छोटे विक्रेतेदेखील त्रस्त झाले आहेत. वर्षभर कष्ट करून पिकवलेल्या फुलांना भाव नसल्याने फूल विक्रेत्यांच्या अश्रूंची फुलेच झाली.  

दादरच्या बाजारात येणारा अधिकतर माल हा पुणे, सातारा, सांगली, ठाणे, कोल्हापूर, वसई, विरार तर कधी बंगळुरू आणि परदेशातूनही मागविला जातो. वसई येथून सोनचाफा मागविला जातो, तर सातारा, सांगली येथून झेंडू आणला जातो. मुंबई व अनेकदा उपनगरातील विक्रेते येथून फुलांची खरेदी करतात. खरेदी-विक्री जोरात सुरू होऊन ती दुपारी १ वाजेपर्यंत चालते. त्यानंतर मात्र बाजार थंडावतो आणि पहाटेपासून कामाला जुंपलेले विक्रेते आपापल्या दुकानात विसावतात.

तुमची भाषा येत नाही, गुगल पे कूठून आणायचे?

घाऊक बाजारात मालाच्या बाजारभावापेक्षाही कमी भावात विक्री करावी लागते. परिणामी, तोटा सहन करून माल विकावा लागतो. फुले फार काळ टिकत नसल्याने आलेला माल लवकरात लवकर खपविण्याचा प्रयत्न असतो. अनेकदा तर ग्राहक गुगल पेवर पैसे देण्याचा प्रयत्न करतात. पण, ज्यांना शहराची भाषा नीट येत नाही त्यांच्याकडे गुगल पे काय असणार? - निर्मला वाघे, फूल विक्रेत्या.

हाती काहीच लागत नाही

मुलांच्या शिक्षणासाठी बाजूला ठेवलेले २०० रुपये खर्च करून कर्जतवरून दादर बाजारात माल विक्रीसाठी घेऊन येतो. मात्र, दिवसाच्या शेवटी ५०० ते ६०० रुपयांशिवाय हाती काहीच येत नाही. दिवसभरात काही न खाता सात ते आठ किलोमीटर पायी चालून घेतलेले कष्ट फळाला येतील इतकेही पैसे पदरात पडत नाहीत. - लीलाबाई आणि आशा थोराड, फूल विक्रेत्या.

 

टॅग्स :मुंबई