पूरग्रस्तांच्या मदतीला पोहणार्यांची टीम?
By Admin | Updated: May 27, 2014 02:04 IST2014-05-27T02:04:07+5:302014-05-27T02:04:07+5:30
पाऊसकाळात घरात, चाळींमध्ये किंवा सखल भागातील पुराच्या पाण्यात लोक अडकली तर अशा आपद्ग्रस्त किंवा पूरग्रस्त लोकांची सुटका करण्यासाठी तालुक्यात गाव निहाय पट्टीच्या पोहणार्यांची टिम तयार करण्यात आली

पूरग्रस्तांच्या मदतीला पोहणार्यांची टीम?
वरपगांव : पाऊसकाळात घरात, चाळींमध्ये किंवा सखल भागातील पुराच्या पाण्यात लोक अडकली तर अशा आपद्ग्रस्त किंवा पूरग्रस्त लोकांची सुटका करण्यासाठी तालुक्यात गाव निहाय पट्टीच्या पोहणार्यांची टिम तयार करण्यात आली असून यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवीतहानी होण्याची शक्यता वाटत नसल्याचे अधिकार्यांचे म्हणणे आहे. २००५ च्या अतिवृष्टीने तालुक्यात मोठ्या प्रमाणात जीवीत व वित्तहानी झाली होती. घरात पाणी शिरल्याने म्हारळ गावातील एकाच कुटुंबातील चार व्यक्तींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. वरपमध्येही बाटली कारखान्यांच्या कंपाऊंड मध्ये एक जण बुडाला होता. हिच परिस्थिती कांबा, रायता, मानिवली, मोहिली, मोहना, पावशेपाडा, आणे-भिसोळ या गावांची झाली होती. कित्येकांचे तबेले उद्ध्वस्त झाले, गायी, म्हशी, बैल, लाकडी ओंडके मोठ्या प्रमाणावर वाहत जात होते. प्रत्येक जण स्वत:चा जीव कसा वाचेल याच्याच तयारीत होता. अनेकांना पोहता येत नसल्याने व वाचविणारा कुणी नसल्याने जीव सोडला. त्यामुळे ही उणीव लक्षात घेऊन आपत्कालीन व्यवस्थापन समितीने त्यांच्या पुस्तकेत तालुक्यातील पट्टीच्या पोहणार्यांची नावे, फोन नंबर व पत्ता यांचा समावेश केला आहे. जेणेकरून ते त्यांच्याच गावाच्या जवळपासच्या आपद्ग्रस्त किंवा पूरग्रस्त नागरिकांची सुटका करतील. रायता-अश्वमेध ग्रुप पट्टीचे पोहणारे १६, गोवेली ७, कांबा १०, वरप १०, म्हारळ १५, टिटवाळा ४, वासुंद्री १, गुरवली १, ओझर्ली १ या शिवाय आपटील, मानिवली, मोहना येथेही अशा पोहणार्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे या पावसाळ्यात काही नैसर्गिक आपत्ती आल्यास नागिराकंनी घाबरू नये असे अधिकार्यांनी आवाहन केले आहे. (वार्ताहर)