Join us  

गुरुजींच्या शिकवणीने पाया केला पक्का- एकनाथ डवले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 5:32 AM

शाळा सुटल्यानंतर रात्रीही ते वर्ग घ्यायचे. घरी वीज नसल्यामुळे बहुतेक विद्यार्थी रात्री गुरुजींकडे अभ्यासाला असायचे

मुंबई : बुलडाणा जिल्ह्याच्या माळवंडी गावातल्या शेतकरी कुटुंबातला माझा जन्म. आई-वडील दोघेही निरक्षर. मी खूप शिकावं आणि मोठं व्हावं यासाठी वडिलांनी नेहमी प्रोत्साहन दिलं. शिक्षणाच्या उणिवेने त्यांच्या ठायी असलेली अस्वस्थता माझ्या माध्यमातून दूर करण्याचे त्यांचं स्वप्नं होतं. ते दिवस कमालीच्या संघर्षाचे होते. स्वप्न सत्यात उतरविण्याची पहिली ऊर्मी आई-वडिलांकडूनच मिळाली. गावातल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सातवीपर्यंत शिक्षण झालं. त्यावेळी एक वा दोन शिक्षकी शाळा असायच्या. शिक्षक गावातच राहायचे.

शाळा सुटल्यानंतर रात्रीही ते वर्ग घ्यायचे. घरी वीज नसल्यामुळे बहुतेक विद्यार्थी रात्री गुरुजींकडे अभ्यासाला असायचे. सातवीची बोर्डाची परीक्षा दिल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी गावापासून १५ किमी अंतरावरील जिल्हा परिषदेच्या हायस्कुलात प्रवेश घेतला. दळणवळणाची सोय नव्हती. मी दररोज तीन किलोमीटर जवळच्या गावापर्यंत पायी आणि तिथून बसने हायस्कूलला असा प्रवास दहावीपर्यंत केला. हा पायी प्रवास जीवनाला कलाटणी देणारा ठरला. शेजारच्या गावात राहणारे बिलारी गुरूजी हायस्कूलमध्ये शिकवायचे. मी त्यांच्यासोबत शाळेत जायचो. मग पायी व बसच्या प्रवासात बिलारे गुरूजी मला इंग्रजी आणि गणिताचे धडे द्यायचे. त्यांच्या चालत्या-बोलत्या शिकवणीने माझ्या शिक्षणाचा पाया पक्का केला. गुरूजींनी शिष्यवृत्ती परीक्षेचेही मार्गदर्शन केलं. त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीनं अभ्यासात हुरुप तर यायचाच, पण उपसत असलेल्या कष्टाचं एक ना एक दिवस नक्कीच चिज होईल अशी प्रेरणा आपसुकच मिळत राहायची.अभियांत्रिकी शिक्षणासाठी मी नांदेडला गेलो. प्रा. अकरदे यांच्या प्रोत्साहनामुळे तिथे मी गेट परीक्षा चांगल्या गुणांनी पास झालो. त्यामुळे आत्मविश्वास वाढला. आयुष्य घडविण्यासाठी शिक्षकांचे योगदान अतिशय महत्त्वाचे असते. ते सतत प्रेरणा देत असतात. आदर्श हे आपल्या अवतीभोवती असतात व शिक्षकांमध्ये असे आदर्शत्व मला नेहमीच जाणवले. त्यांच्यापासून मिळालेल्या ज्ञानाचा मला आजही फायदा होतो.

टॅग्स :मुंबईशिक्षकशिक्षक दिन