मुंबई - मुंबईत रविवारी घेण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) कोणत्याही अडथळ्याविना पार पडली. या परीक्षेसाठी १२,५८८ नोंदणीकृत उमेदवारांपैकी ११,४४२ उमेदवारांनी परीक्षा दिली. तर १,१४६ उमेदवार गैरहजर राहिले.
पश्चिम मुंबईत पहिल्या पेपरसाठी २,०४० उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १,८६८ उमेदवार हजर, तर १७९ उमेदवार गैरहजर होते. दुसऱ्या पेपरसाठी २,९४१ नोंदणींपैकी २,६९५ उमेदवारांनी परीक्षा दिली व २४६ उमेदवार अनुपस्थित राहिले. बायोमेट्रिक हजेरी व कडक तपासणीमुळे परीक्षा शिस्तबद्ध पार पडल्याचे पश्चिम विभागाचे शिक्षण निरीक्षक संजय जावीर यांनी सांगितले. दक्षिण विभागात पहिल्या पेपरसाठी १,४५५ पैकी १,३२० उमेदवारांनी तसेच दुसऱ्या पेपरसाठी २,०५२पैकी १,८५६ उमेदवारांनी हजेरी लावली. दोन्ही पेपर मिळून ३,५०७ नोंदणीकृत उमेदवारांपैकी ३,१७६ उमेदवारांनी सहभाग नोंदविला. एकूण दोन्ही पेपर मिळून ३३१ उमेदवार गैरहजर राहिले, अशी माहिती शिक्षण निरीक्षक वैशाली वीर यांनी दिली.
यंदा शिक्षकांची नोंदणी वाढलीउत्तर विभागात पेपर एकसाठी १,८८२पैकी १,७३४ उमेदवार उपस्थित होते, १४८ अनुपस्थित राहिले. पेपर दोनसाठी २,२८० उमेदवारांपैकी २,०७८ उमेदवार उपस्थित, तर २७८ उमेदवार अनुपस्थित राहिल्याची माहिती उत्तर विभाग शिक्षण निरीक्षक मुस्ताक शेख यांनी दिली. सप्टेंबर २०२५च्या सर्वोच्च न्यायालयीन निर्णयामुळे टीईटीशिवाय प्रमोशन व नोकरीची शाश्वती धोक्यात आली. त्यामुळे यंदा शिक्षकांची नोंदणी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे जुनी पेन्शन संघटनेचे शिक्षक समन्वयक शंकर धावरे यांनी सांगितले.
टीईटी परीक्षेपूर्वीच जळगावात शिक्षकाचा मृत्यू
राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देण्यासाठी जळगावात आलेले शिक्षक संदीप प्रल्हाद पवार (४२, मूळ रा. बिल्दी, ता. पाचोरा, ह. मु. पाचोरा) यांचा परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी (२३ नोव्हेंबर) सकाळी मू. जे. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर घडली. रविवारी राज्य शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेसाठी पाचोरा तालुक्यातील लाखतांडा येथील जि. प. प्राथमिक शाळेचे शिक्षक संदीप पवार हे सकाळी दुचाकीने जळगावात आले. मू. जे. महाविद्यालयात परीक्षा केंद्र होते. परीक्षेसाठी आत जाण्यापूर्वी ते महाविद्यालयासमोरील दुकानावर झेरॉक्स काढण्यासाठी गेले. तेथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सहकाऱ्यांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.
परीक्षा परिषदेच्या सूचनेनुसार भरारी पथकांद्वारे सातत्याने परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवले. परीक्षा उत्तमपणे पार पडली. बायोमेट्रिक हजेरी व कोणतीही साधने परीक्षा केंद्रावर नेण्यास प्रतिबंध केल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. - संजय जावीर, शिक्षण निरीक्षक, शिक्षण विभाग
Web Summary : Thousands of teachers appeared for the TET exam to secure their jobs following a court order. Jalgaon saw a teacher's tragic death before the exam. Strict measures ensured smooth conduct.
Web Summary : अदालत के आदेश के बाद नौकरी सुरक्षित करने के लिए हजारों शिक्षक टीईटी परीक्षा में शामिल हुए। जलगाँव में परीक्षा से पहले एक शिक्षक की दुखद मौत हो गई। सख्त उपायों से सुचारू संचालन सुनिश्चित हुआ।