शिक्षकांचा पोलिसांशी वाद

By Admin | Updated: August 2, 2014 01:42 IST2014-08-02T01:42:53+5:302014-08-02T01:42:53+5:30

शाळेचा कार्यक्रम थांबवल्याने शाळेचे शिक्षक आणि पोलीस यांच्यात वाद झाला आहे.

Teacher's complaint with the police | शिक्षकांचा पोलिसांशी वाद

शिक्षकांचा पोलिसांशी वाद

नवी मुंबई : शाळेचा कार्यक्रम थांबवल्याने शाळेचे शिक्षक आणि पोलीस यांच्यात वाद झाला आहे. ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीवरून पोलीस सेक्रेट हार्ट शाळेत गेले असता हा प्रकार घडला. त्यावरून शाळेच्या शिक्षकांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन यासंदर्भाची तक्रार केली.
वाशी सेक्टर ९ येथील सेक्रेट हार्ट शाळेमध्ये शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला. शाळा असल्याने सदरचा परिसर हा सायलेंस झोन जाहीर करण्यात आला आहे. तरीही सदर शाळेतच मोठ्या प्रमाणात आवाज होत असल्याची तक्रार ज्येष्ठ नागरिक अजय मराठे यांनी केली होती. मराठे हे शाळेलगतच्या परिसरात राहणारे असल्याने त्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल त्यांनी यापूर्वीही अशी तक्रार केली. त्यांच्या तक्रारीनुसार २६ जुलै रोजी पोलीस या शाळेत गेले होते. यावेळी तेथे सुरू असलेला कार्यक्रम पोलिसांनी बंद केला होता. त्यामुळे शाळेतील शिक्षक आणि पोलीस यांच्यात वाद देखील झाला होता. शुक्रवारी पुन्हा सेक्रेट हार्ट शाळेत मोठ्या आवाजामध्ये कार्यक्रम सुरू होता. त्यामुळे सुरू असलेल्या कार्यक्रमाचा आवाज कमी करण्यास सांगण्यासाठी पोलीस तेथे गेले होते. यावेळी पोलिसांनी सुरू असलेले राष्ट्रगीत थांबवल्याचे शाळेतील शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यानुसार पोलिसांच्या तक्रारीकरिता स्थानिक नगरसेवक वैभव गायकवाड यांच्यासोबत या शिक्षकांनी पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांची भेट घेतली.
मात्र पोलिसांनी केवळ तेथे सुरू असलेल्या स्पीकरचा आवाज कमी करण्याची सूचना त्यांना केली. त्यावेळी शाळेतील शिक्षकांनीच पोलीस कर्मचाऱ्यांना तुमची तक्रार आयुक्तांकडे करतो असे धमकावल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम पाठारे यांनी सांगितले. तर यावेळी तेथे राष्ट्रगीत सुरू नव्हते, असेही पाठारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Teacher's complaint with the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.