वर्षभरापासून एक शाळा एक शिक्षिका
By Admin | Updated: July 3, 2015 22:37 IST2015-07-03T22:37:46+5:302015-07-03T22:37:46+5:30
डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा परिसरातील संत तुकडोजी महाराज प्राथमिक विद्यालय या महापालिकेच्या शाळेत गेल्या वर्षभरापासून एकच शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम

वर्षभरापासून एक शाळा एक शिक्षिका
प्रशांत माने, कल्याण
डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा परिसरातील संत तुकडोजी महाराज प्राथमिक विद्यालय या महापालिकेच्या शाळेत गेल्या वर्षभरापासून एकच शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करीत आहेत. या शाळेला संगणक दिला नसल्याने संगणकीय ज्ञानापासून येथील विद्यार्थी वंचित राहिले आहेत.
पहिली ते चौथी इयत्तेचे विद्यार्थी या शाळेत शिकत आहेत. विद्यार्थी पटसंख्या ४५ इतकी आहे. सध्या या ठिकाणी असलेल्या महिला मुख्याध्यापकांवरच विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी येऊन ठेपली आहे. त्यामुळे पालिकेच्या ७४ शाळांमध्ये ‘एक शाळा एक शिक्षिका’असे समीकरण असलेली ही एकमेव शाळा ठरली आहे. या शाळेतील अन्य एक शिक्षक मागील वर्षी ३० जून २०१४ ला निवृत्त झाले. नव्या शिक्षकाच्या नेमणुकीबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही ते दिलेले नाहीत. शाळेत दोन वर्गखोल्या असून नुकतीच त्यांची रंगरंगोटी केली आहे. परंतु, या ठिकाणी सफाई कर्मचारी दिलेला नसल्याने शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच सुरक्षा कर्मचारी नसल्याने येथील सुरक्षाही वाऱ्यावर आहे. विशेष बाब म्हणजे आजवर या शाळेला संगणक देण्यात आलेला नाही. त्यामुळे येथील विद्यार्थी संगणक ज्ञानापासून दूरच राहिले आहेत. या शाळेत पहिलीचे विद्यार्थी शिकत आहेत. त्यांना बेंचवर बसता येत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी सतरंजी असावी, अशी मागणी त्यांच्या पालकांकडून होत आहे. परंतु, त्याचीही पूर्तता आजतागायत झालेली नाही.