मुंबई : सन २०१६ मध्ये दोन शाळा शिक्षकांना झालेल्या कथित मारहाणीच्या प्रकरणात सत्र न्यायालयाने मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा आरोपमुक्ततेचा अर्ज फेटाळला. पीडितांच्या जबाबांमध्ये आरोपांना समर्थन देणारे पुरेसे पुरावे उपलब्ध असल्याने त्यांच्या विरोधात आरोप निश्चित करणे योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले.
अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी दिलेल्या निर्णयात म्हटले, इतर साक्षीदारांनीही तावडे यांनी शिक्षकांवर हल्ला केल्याचे सांगितले आहे. ही घटना २९ जुलै २०१६ रोजी वाकोला परिसरातील महानगरपालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेत घडली होती.
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, कर्करोगाशी झुंज देत असलेल्या एका महिला शिक्षकांच्या अचानक बदलीवरून वाद निर्माण झाला.
तावडे आणि इतर सहा जणांनी शाळेत जाऊन व्यवस्थापनाशी या बदलीच्या मुद्द्यावर वाद घातला. तो आणखी चिघळला. आरोपींनी व्यवस्थापनाला शिवीगाळ करत दोन शिक्षकांवर मारहाण केल्याचा आरोप पोलिसांनी केला.
याप्रकरणी ११ ऑगस्ट २०१६ रोजी एफआयआर नोंदवण्यात आला आणि बचाव पक्षाने १३ दिवसांचा विलंब का करण्यात आला, याचे उत्तर देण्यात आले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले.
तावडे यांचे म्हणणे काय?रितू तावडे यांनी अर्जात म्हटले की, त्या घटनेच्या ठिकाणी त्यांची उपस्थिती ‘योगायोगाने’ होती आणि कथित जमावाच्या घटनेशी संबंधित नव्हती. तसेच, त्यांच्या भाजप नगरसेवकपदाचा वापर करून तक्रारदार (शाळेच्या मुख्याध्यापिका) यांनी ‘अनुचित प्रसिद्धी मिळवण्यासाठी’ त्यांना खोट्या प्रकरणात अडकवले.
सरकारी वकील इक्बाल सोलकर यांनी युक्तिवाद केला की, पीडितांच्या जबाबांमधून स्पष्ट होते की, तावडे यांनी दोन्ही शिक्षकांच्या कानशिलात लगावली. ‘शाळा ही विद्यार्थ्यांना जीवनाचे धडे मिळवण्याची जागा आहे. अशा ठिकाणी घडलेला वाद गंभीरतेने पाहिला पाहिजे,’ असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
सर्व बाबींचा विचार केल्यानंतर न्यायालयाने नमूद केले की, पीडितांनी स्पष्टपणे अर्जदाराचे नाव घेतले असून, त्यांनी शाळेच्या आत हाताने मारहाण केल्याचे सांगितले आहे. तसेच इतर साक्षीदारांनीही तावडे यांनी मारहाण केल्याचे म्हटले असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले. आरोप निश्चित करण्यासाठी हे पुरेसे आहे, असे स्पष्ट करत न्यायालयाने तावडे यांचा अर्ज फेटाळला.
Web Summary : Mumbai court rejected Mayor Ritu Tawde's discharge plea in a 2016 teacher assault case. Witnesses corroborated the assault, leading the court to deem charges appropriate. Tawde claimed coincidental presence and false implication, but the court emphasized victim testimonies and witness accounts.
Web Summary : मुंबई कोर्ट ने 2016 के शिक्षक मारपीट मामले में महापौर रितु तावडे की याचिका खारिज की। गवाहों ने मारपीट की पुष्टि की, जिससे कोर्ट ने आरोप तय करना उचित माना। तावडे ने संयोगवश उपस्थिति और झूठे आरोप का दावा किया, लेकिन कोर्ट ने पीड़ित गवाही और गवाहों के खातों पर जोर दिया।