Join us  

‘ते’ दाम्पत्य पुन्हा पोलिसांच्या सेवेत, दिवसाला १०० हून अधिक पोलिसांच्या चहा, नाश्त्याची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 10:29 AM

रोजमोड डिसुझा आणि स्विटी डिसुजा असे या दाम्पत्याचे नाव आहे. ते चेंबूरमध्ये राहतात. रोजमोड हे सिव्हील कॉन्ट्रॅक्टर, तर स्विटी या गृहिणी आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आम्ही दोघे सामान खरेदीसाठी बाहेर पडलो.

मनीषा म्हात्रे -मुंबई : कोरोना संकटाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना माणुसकीच्या नात्याने चेंबूरचे ‘ते’ दाम्पत्य पुन्हा चहा, नाष्टा देत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही या दाम्पत्याने १०० हून अधिक दिवस पोलिसांची सेवा केली होती. त्यानंतर आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत, ज्या भागात कोरोनाचा जास्त धोका आहे, अशा ठिकाणी तैनात असलेल्या १०० ते १२० पोलिसांना ते चहा, नाश्ता देत आहेत.

रोजमोड डिसुझा आणि स्विटी डिसुजा असे या दाम्पत्याचे नाव आहे. ते चेंबूरमध्ये राहतात. रोजमोड हे सिव्हील कॉन्ट्रॅक्टर, तर स्विटी या गृहिणी आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आम्ही दोघे सामान खरेदीसाठी बाहेर पडलो. तेथे रस्त्यावर भरउन्हात तहान, भूक विसरून सेवा बजावत असलेल्या पोलिसांकडे लक्ष गेले आणि त्यांना धन्यवाद म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी करायचे ठरवले, असे रोजमोड सांगतात.

सुरुवातीला थंड पेय द्यायचे ठरवले. मात्र, कोरोनामुळे ते योग्य नसल्याने घरचा आयुर्वेदिक चहा बनवून सोबत खायला देण्याचा निर्णय घेतला. दुपारी १ वाजता मी आणि पत्नी चहा आणि नाष्टा बनवायला घेतो. पराठे होईपर्यंत ३ वाजतात. चहा आणि नाष्टा गाडीत भरून जेथे कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे, अशा ठिकाणी दिवसाला ८ ते १० नाकाबंदी पाईंट्सवरील पोलिसांपर्यंत हा नाष्टा पोहोचविण्याचे काम करताे, असे त्यांनी सांगितले.  

गेल्या वर्षी जूनपर्यंत एकही दिवस न चुकता त्यांनी ही सेवा केली. त्यात ‘ब्रेक द चेन’अंतर्गत पुन्हा लॉकडाऊन लागल्याने पोलीस रस्त्यावर उतरले. त्यांच्यासाठी दुपारी तीन ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कारमधून चहा आणि नाष्टा घेऊन डिसुझा दाम्पत्याची गाडी नाकाबंदीच्या विविध पाईंट्सवर पोलिसांसाठी धाव घेते. ज्या भागात कोरोनाचा जास्त धोका आहे, अशा वाशीपासून ते चेंबूरपर्यंत ते ही सेवा पुरवत आहेत. जेव्हा जेव्हा पोलीस रस्त्यावर तैनात असतील तेव्हा आमच्याकडून शक्य तितकी मदत करण्यात येईल, असे डिसुझा दाम्पत्याने सांगितले.

योग्य वेळी योग्य मदत पोहोचविणे गरजेचेआपण स्वतःसाठी काहीतरी करण्यापेक्षा दुसऱ्यांसाठीही थोडा पुढाकार घेतल्यास एक वेगळेच समाधान मिळते. योग्य वेळी योग्य मदत पोहोचविणे गरजेचे असल्याचे डिसुझा दाम्पत्य म्हणाले. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोनाची लसहॉस्पिटलडॉक्टरपोलिस