मुंबई :
पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासनिसांना (टीसी) ड्युटीवर असताना बॉडी कॅमेरे देण्यात येणार आहेत. त्यामुळे तिकीट तपासणी सुरू असताना काही अनुचित प्रसंग घडल्यास त्याचे रेकॉर्डिंग करणे शक्य होईल आणि त्याचा उपयोग संबंधितांवर कारवाईसाठी केला जाईल.
विनातिकीट प्रवाशांना पकडल्यावर ते बऱ्याचदा दंड भरण्यास तयार नसतात. अशा वेळी टीसीशी वाद होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत जाते. त्यामुळे पश्चिम रेल्वेने अशा प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून टीसींच्या शरीरावर बॉडी कॅमेरे बसवून त्यांना ड्युटीवर पाठविले जाणार आहे. विनातिकीट प्रवाशांशी वाद झाल्यास रेल्वे कायदा १९८९च्या कलम १४० अंतर्गत रेकॉर्ड केलेला व्हिडीओ कारवाईसाठी उपयुक्त ठरेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्री-कस्टडी एरिया विनातिकीट प्रवास करताना पकडल्यानंतर, प्रवाशाने दंड भरण्यास नकार दिल्यास त्याला प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या प्री-कस्टडी एरियामध्ये ठेवण्यात येईल. तेथे त्याला नियम समजावून सांगितले जातील. जर प्रवासी दंड भरण्यास नकार देत असेल तर एक मेमो जारी करून त्याला आरपीएफकडे सुपूर्द केले जाईल. सध्या बोरिवली आणि अंधेरी स्थानकांवर प्री-कस्टडी एरिया तयार करण्यात येत आहे. कालांतराने सर्व स्थानकांवर तशी व्यवस्था करण्यात येणार आहे.
तिकीट तपासणीत पारदर्शकता येण्यासाठी बॉडी कॅमेरे देण्यात येत आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर वचक ठेवण्यास मदत होईल. - विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे
३२.१६ लाखांचा दंड वसूलकॅमेऱ्याच्या चाचणीसाठी २३ जानेवारीपासून विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी काही टीसींना बॉडी कॅमेरे दिले होते. विनातिकीट प्रवास करणाऱ्या सात हजारांहून अधिक प्रवाशांकडून ३२.१६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.
कारवाई अशी...७३६२ प्रकरणे११०० पश्चिम रेल्वेवर टीसी४०० मुंबई उपनगरातील टीसी