टॅक्सी-रिक्षा संपाने केले बेहाल
By Admin | Updated: June 18, 2015 01:19 IST2015-06-18T01:19:34+5:302015-06-18T01:19:34+5:30
रिक्षा संपाचा फटका सामान्य नागरिकांना देऊन स्वत:च्या मागण्या मान्य करून घेण्याचा युनियनचा डाव मुंबईकरांनी एकमेकांना

टॅक्सी-रिक्षा संपाने केले बेहाल
प्रवाशांचे झाले हाल : उपनगरात खासगी वाहनांनी दिली लिफ्ट
मुंबई : रिक्षा संपाचा फटका सामान्य नागरिकांना देऊन स्वत:च्या मागण्या मान्य करून घेण्याचा युनियनचा डाव मुंबईकरांनी एकमेकांना सहकार्य करून हाणून पाडला. मालाड, मालवणी, कांदिवली, बोरीवली तसेच दहिसर परिसरात रिक्षाचालकांकडून बंद पाळण्यात आला असला तरी खासगी वाहनधारकांनी या वेळी प्रवाशांना चांगलीच साथ दिली. कार, मोटारसायकलवर लिफ्ट दिली जात होती.
मालाड पूर्वच्या आपापाडा, त्रिवेणी नगर, संतोषनगर, पठाणवाडीसारख्या ठिकाणांहून मालाड स्थानक परिसरात रिक्षा जातात. संपामुळे आज या ठिकाणी असलेल्या स्थानिकांना बेस्ट बसशिवाय पर्याय नव्हता. मात्र त्यातही शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना मदतीचे हात पुढे केले जात होते. सकाळी साडेसहा वाजल्यापासूनच अनेकांनी रेल्वे स्थानकाच्या दिशेने पायी प्रवास सुरू केला. याउलट मालाडच्या मालवणी परिसरात ज्यांच्या कार, मोटारसायकल होत्या त्यांनी स्वत:हून लोकांना जमेल तेवढ्या अंतरापर्यंत लिफ्ट दिली. ‘लोगो को हडताल के बारे मे पता भी नाही था, इसलिये उनको तकलीफ हुई. इसलिये हमने आॅफिस निकलते समय जो जो
लोग रास्ते मे दिखे और जिन्हे मदत करना हमारे बस मे था, उनको हमने लिफ्ट दी', असे एका जाहिरात कंपनीचे प्रमुख विजय सिंग यांनी सांगितले. कांदिवलीत ‘युथ फॉर चेंज’ या एनजीओने सकाळी साडेसहा वाजल्यापासूनच चाकरमान्यांना गल्लीबोळात आणि पादचारी मार्गावरून ‘मोफत’ १९ सीटर बससेवा उपलब्ध करून दिली. त्यात शाळकरी मुले, महिला आणि वृद्धांची संख्या अधिक होती तर डॉक्टर, इंिजनीअर यांनीही या बसचा लाभ घेतला. गाडीत चढल्यानंतर अनेक जण वीस ते पन्नास रुपये या संस्थेचे प्रमुख निखिल व्यास यांच्या हातात देत होते. तेव्हा ही मदत निव्वळ माणुसकीच्या नात्याने केली जात असल्याने ती नि:शुल्क असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या एनजीओचे प्रवाशांनी आभार मानले. जवळपास सकाळी साडेसहापासून सुरू झालेली ही सेवा साडेअकरा वाजेपर्यंत सुरू होती. त्यानुसार या गाडीने चारकोप, महावीर नगर, डहाणूकरवाडी, शंकर गल्लीसारख्या परिसरात २0 फेऱ्या चालवल्या. बोरीवली ते दहिसरमध्येही रिक्षाअभावी स्थानिकांचे हाल झाल्याचे दिसून आले.
पूर्व उपनगरात
अल्प प्रतिसाद
पूर्व उपनगरातील मुलुंड परिसरात या संपाचा काही अंशी परिणाम पाहण्यास मिळाला. त्यातच पावसानेही दांडी मारल्यामुळे चाकरमान्यांना याचा जास्त फटका बसला नाही. नागरिकांनी बसचा आधार घेतल्यामुळे त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात गर्दी होती. मुलुंड चेकनाका आणि आनंद नगर टोलनाक्याजवळ शिवसेनेच्या रिक्षा धावताना दिसल्या. तर भांडुप एलबीएस मार्ग, स्टेशन परिसरातही तीच परिस्थिती होती. कांजूर रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना पायीच महाविद्यालये गाठावी लागली. विक्रोळी परिसरातील शेअर आॅटो बंद असल्याने विक्रोळीकरांनी बस डेपोकडे धाव घेतली. गर्दीअभावी अनेकांनी पायी जाणे पसंत केले. दुपारच्या सुमारास या गर्दीचा ओघ कमी होताना दिसला. अनेकांनी संपामुळे बाहेर निघणे टाळले.
टीम लोकमत
मुंबई आॅटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनकडून विविध मागण्यांसाठी बुधवारी पुकारण्यात आलेल्या ‘रिक्षा बंद’ला पूर्व उपनगरात अल्प प्रतिसाद मिळाला तर पश्चिम उपनगरात रिक्षाचालक बंदमध्ये सहभागी झाल्याने प्रवाशांचे पुरते हाल झाले. सकाळी कामावर जाण्याची घाई, मुलांना शाळेत सोडण्यासाठी जाणाऱ्या पालकांची धावपळ आणि कॉलेज विद्यार्थ्यांच्या लगबगीला नेहमीप्रमाणे रिक्षांची साथ मिळाली
नाही. त्याचा फटका प्रवाशांना बसला. रिक्षाचालकांनी पुकारलेल्या बंदला उपनगरात मिळालेल्या प्रतिसादाचा
‘टीम लोकमत’ने घेतलेला आढावा...
कुर्ला येथे काही चालकांची चांदी
आजच्या या संपात ज्या युनियन सहभागी नव्हत्या त्यांच्या रिक्षा रस्त्यावर पाहायला मिळत होत्या. मात्र या रिक्षाचालकांकडून ठरलेल्या भाड्यापेक्षा १० ते २० पटीने भाडे आकारले जात होते. मीटरप्रमाणे रिक्षाचालक जात नव्हता. त्यामुळे प्रवाशांना नाइलाजास्तव मागेल ती रक्कम द्यावी लागत होती. कुर्ला व टिळकनगरमध्ये तर रिक्षाचालक आणि काही प्रवाशांमध्येच भांडणे पाहायला मिळत होती.
मानखुर्दमध्ये
मोफत सेवा
मुंबईकरांची ही समस्या लक्षात घेऊन काही संस्थांनी आज मुंबईकरांसाठी मोफत वाहनांची सोय केली होती. मानखुर्द परिसरात एका सामाजिक संस्थेने साठे नगर ते मानखुर्द रेल्वे स्थानक आणि गोवंडी रेल्वे स्थानकापर्यंत ही सेवा उपलब्ध केली होती. त्यातच आज सकाळीच पावसाने हजेरी लावल्याने याचा मोठा फायदा रहिवाशांना झाला.