मुंबईकरांवर करांचा बोजा वाढणार
By Admin | Updated: January 6, 2015 00:54 IST2015-01-06T00:54:02+5:302015-01-06T00:54:02+5:30
जागेच्या चटई क्षेत्रफळावर (कार्पेट) स्टॅम्प ड्युटीच्या रेडीरेकनरच्या दरानुसार कर आकारणी यापुढे केली जाणार आहे़

मुंबईकरांवर करांचा बोजा वाढणार
मुंबई : जागेच्या चटई क्षेत्रफळावर (कार्पेट) स्टॅम्प ड्युटीच्या रेडीरेकनरच्या दरानुसार कर आकारणी यापुढे केली जाणार आहे़ त्यामुळे भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता करात जानेवारीपासून सुधारित दर लागू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे़ याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आला आहे़ मात्र या दरवाढीमुळे मुंबईकरांवर अतिरिक्त कराचा बोजा पडणार आहे़
१ एप्रिल २०१० या पूर्वलक्षी प्रभावाने भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली पालिकेने लागू केली आहे़ त्यानुसार जागेच्या बाजारभावाप्रमाणे मालमत्ता कर आकारण्यास सुरुवात झाली आहे़ मात्र सुधारित मालमत्ता कर हा जागेच्या बिल्टअप एरियानुसार आकारला जात असल्याने अनेक मालमत्ताधारकांनी न्यायालयात धाव घेतली़ यावर सुनावणीदरम्यान, इमारतीच्या बिल्टअप क्षेत्रावर भांडवली मूल्य निश्चित करण्याची तरतूद ही पालिका अधिनियम १५४ (१) (अ) च्या तरतुदींशी विसंगत असल्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत़
त्यामुळे आता यात बदल करून बिल्टअपऐवजी कार्पेट क्षेत्रफळानुसार कराची आकारणी केली जाणार आहे़ त्यानुसार फ्लॅट अथवा इमारतीच्या कार्पेट क्षेत्रफळावर रेडीरेकनरचा दर आणि त्यावर १़२ टक्के अशी गणना करून हा कर वसूल करण्यात येणार आहे़ हा प्रस्ताव निवडणुकीच्या काळात लांबणीवर टाकण्यात आला होता़ मात्र बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत यावर निर्णय होणार आहे़ (प्रतिनिधी)
च्सुधारित मालमत्ता कराच्या आकारणीमुळे पालिकेच्या तिजोरीत २६८६ कोटी ६१ लाख रुपये पडण्याचा अंदाज आहे़
च्१़२ टक्के कर आकारू नये, या नगरसेवकांच्या मागणीमुळे मालमत्ता करातून अपेक्षित उत्पन्न २९७ कोटी रुपयांनी घटणार आहे़
च्३३०० जमिनी व इमारतींची ४४७ कोटींची मालमत्ता देयके तयार करण्यात आली आहेत.