४ लाख ठाणेकरांवर करवाढीची कुऱ्हाड

By Admin | Updated: February 12, 2015 22:44 IST2015-02-12T22:44:28+5:302015-02-12T22:44:28+5:30

डबघाईला आलेल्या ठाणे महापालिकेचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी नवे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मालमत्ताकरात छुपी तर पाणीकरात उघड वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे़

Taxes on 4 lakh Thanekar | ४ लाख ठाणेकरांवर करवाढीची कुऱ्हाड

४ लाख ठाणेकरांवर करवाढीची कुऱ्हाड

अजित मांडके, ठाणे
डबघाईला आलेल्या ठाणे महापालिकेचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी नवे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मालमत्ताकरात छुपी तर पाणीकरात उघड वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे़ लोकप्रतिनिधींचा विरोध लक्षात घेऊन मालमत्ताकरात सरसकट वाढ न करता त्यात समाविष्ट असलेल्या जललाभ, हस्तांतरण, मलनि:सारणकरात सुमारे ५ ते ७ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. ही करवाढ छुपी असून सरतेशेवटी मालमत्ताकरात आपोआप वाढ होणार आहे. याचा सर्वात मोठा फटका शहरातील ३ लाख ८७ हजार ३१६ मालमत्ताधारकांना बसणार आहे़ यामध्ये अधिकृत १ लाख १४ हजार ५१७ आणि अनधिकृत २ लाख ७२ हजार ७९९ मालमत्ताधारकांचा समावेश आहे.
तसेच मालमत्ताकराबरोबरच घरगुती पाणीवापराच्या आकारातही वाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. विशेष म्हणजे ही दरवाढ करताना सदनिकाधारकांना यापुढे चौरस फुटांप्रमाणे पाणीआकार भरावा लागणार आहे. या दरवाढीचा फटका १ लाख ३० हजार ग्राहकांना बसणार आहे. या करवाढीपोटी पालिकेच्या तिजोरीत ५५ ते ६० कोटींची भर पडणार असून केवळ उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने ही करवाढ करण्याचे पालिकेने निश्चित केले आहे. जलभारावर पालिकेला १५ कोटी, पाणीपट्टीपोटी २५ कोटी, मलनि:सारण १५ कोटी, उर्वरित हस्तांतरणापोटी ५ ते ८ कोटींचे वाढीव उत्पन्न मिळणार आहे.

Web Title: Taxes on 4 lakh Thanekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.