Join us  

Maharashtra Budget 2021: इंधनावरील करात कपात? अर्थसंकल्पात जनतेला दिलासा मिळण्याची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 5:39 AM

महाराष्ट्राचा आज अर्थसंकल्प; जनतेला दिलासा मिळण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आज, सोमवारी वित्तमंत्री अजित पवार विधानसभेत सादर करणार असून त्यात पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीवर दिलासा  मिळणार का, याकडे राज्याचे लक्ष  लागले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, राज्यांनी आपापले स्थानिक कर कमी करून पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी कराव्या, असे सांगितले होते. तर केंद्राने आपले कर कमी करावेत, अशी बहुतांश राज्य सरकारांची मागणी आहे. राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्याची भूमिका राज्य सरकार घेण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या किमती वाढत असल्याने सामान्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. 

वित्तीय तूट १ लाख कोटींवरवित्तमंत्री अजित पवार यांनी २०२०-२१ या वर्षाचा अर्थसंकल्प ६ मार्च २०२० रोजी विधानसभेत सादर केला होता. त्या वेळी राज्याच्या तिजोरीत ३ लाख ४७ हजार ४५७ कोटी रुपये येतील आणि ३ लाख ५६ हजार ९६८ कोटी महसुली खर्च होतील, असे सांगितले होते. अर्थसंकल्पात ९,५११ कोटी रुपयांची महसुली तूट येईल, असा अंदाज हाेता. वित्त विभागाच्या मते ३१ मार्चपर्यंत अंदाजे २ लाख ३४ हजार कोटी महसूल मिळेल. त्यामुळे राज्याची एकूण तूट १ लाख १४ हजार कोटींच्या घरात जाणार आहे. शिवाय पूर्ण वर्षासाठी पगार, निवृत्तिवेतन, मानधन, भाडे, वीजबिले, वाहन खर्च यावर होणारा अनिवार्य खर्च १ लाख ५१ हजार कोटींचा आहे.

भरघोस निधीची मागणी कोरोनामुळे वर्षभर काहीही काम झालेले नाही. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांनी आपल्या विभागाला भरघोस निधी द्यावा, अशी मागणी प्रत्येक विभागाने केली आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा १ लाख १४ हजार कोटींपेक्षा अधिक तुटीचा अर्थसंकल्प मांडला जाईल, अशी भीती वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. राज्यात उत्पन्नाचे स्रोत घटले आहेत, आस्थापनेवरील खर्च वाढले आहेत. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प मांडणे कठीण असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

किमती कमी केल्या तरी...पेट्रोल-डिझेलच्या किमती राज्य सरकारने दोन ते तीन रुपयांनी  कमी केल्या तरी काही हजार कोटींचा अतिरिक्त बोजा तिजोरीवर पडणार आहे. त्यामुळे नेमके किती रुपये पेट्रोल-डिझेलच्या करापोटी कमी केले जातील, हे सोमवारी स्पष्ट होईल. राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करावेत, अशी भाजपची मागणी आहे तर केंद्र सरकारने केंद्राचे कर कमी करावेत, असे राज्य सरकारचे मत आहे. 

टॅग्स :महाराष्ट्र बजेटअर्थसंकल्पअजित पवार