मुंबई : शिक्षण विभागात अजूनही माजी मंत्री विनोद तावडे आणि नंतरचे शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी राबविलेली धोरणेच राबविली जात असून नव्या सरकारचा ताजा आदेश हा त्याचीच प्रचिती देणारा आहे, अशा शब्दांत लोक भारतीचे अध्यक्ष आ. कपिल पाटील यांनी टीका करताना ३३ अभ्यास गट स्थापन करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय म्हणजे राज्यातील शिक्षण व्यवस्था पूर्णपणे मोडीत काढण्याचे नियोजित षड्यंत्र असल्याचे मत व्यक्त केले.या बाबतचे पत्र पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले असून हा निर्णय तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. ही मंत्रिमंडळ बैठक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दीड वर्षांपूर्वी झाली होती. तेव्हा तावडे हे शिक्षणमंत्री होते. मग आधीच्याच मंत्रिमंडळाच्या चुकीच्या निर्णयांची अंमलबजावणी नवे सरकार करणार आहे का, असा सवाल पाटील यांनी केला.राज्यात शिक्षण संस्थांची अनुदान व्यवस्था संपवून प्रतिविद्यार्थी अनुदान म्हणजे ‘व्हाऊचर सिस्टिम’ आणण्याचा या आदेशामागे डाव आहे. यामुळे समान कामाला समान वेतन राहणार नाही, वेतन आयोग राहणार नाही आणि सर्व शिक्षक कंत्राटी मजूर बनतील, असे पाटील यांनी म्हटले आहे.
शिक्षण विभागात अजूनही तावडेंची सत्ता; कपिल पाटील यांंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 23:46 IST