Join us  

Tauktae Cyclone: चक्रीवादळामुळे गेट वे ऑफ इंडिया परिसराला फटका; दोन बेसॉल्ट दगड तुटून दूरपर्यंत फेकले गेले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 8:29 AM

पालिकेकडून सफाई; दहा ट्रक कचरा, गाळ काढला

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाचा फटका गेट वे ऑफ इंडिया परिसराला सोमवारी बसला. या पुरातन वास्तूच्या जेट्टीच्या भिंतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील दोन बेसॉल्ट दगड तुटून दूरपर्यंत फेकले गेले. तसेच समुद्रात उसळलेल्या उंच लाटांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा व गाळ वाहून आला होता. त्यामुळे महापालिकेच्या तब्बल शंभर कामगारांनी मंगळवारी सकाळी या परिसराची साफसफाई करीत दहा ट्रक कचरा गाेळा केला.

चक्रीवादळामुळे मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या गेट वे ऑफ इंडिया या पुरातन वास्तूच्या जेट्टीच्या भिंतींचे मोठे नुकसान झाले. प्रचंड मोठ्या वजनाचे दोन बेसॉल्ट दगड तुटून दूरपर्यंत फेकले गेले. त्याचप्रमाणे वादळामुळे मोठ्या प्रमाणात कचरा, गाळ व रेती वाहून आल्यामुळे हा परिसर अस्वच्छ झाला होता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा वाहून आल्यामुळे ए विभाग कार्यालयाला सफाईसाठी शंभर कामगारांची फौज तैनात करावी लागली.

नूतनीकरणावेळीच डागडुजीसमुद्रात उसळणाऱ्या लाटांचा वेग अधिक असल्याने मोठमोठे दगड गेटवे ऑफ इंडिया परिसरात धडकत होते. यामुळे येथील रस्ते (फ्लोरिंग) उखडले आहेत. तसेच प्रवेशद्वार व संरक्षण भिंतीचे ही नुकसान झाले. एकूण किती नुकसान झाले, याबाबत महापालिका आढावा घेणार आहे. गेटवे ऑफ इंडियाचे नूतनीकरण केले जाणार आहे. त्यावेळीच दुरुस्तीचे कामही केले जाईल, असे पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, चक्रीवादळामुळे गेटवे ऑफ इंडिया येथे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

ऑडिट करून भिंत दुरुस्त करामहापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी दुपारी गेट वे ऑफ इंडिया या पुरातन वास्तूची संपूर्ण पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला. जेट्टीच्या भिंतीचे नुकसान झाल्याने मुंबई पोर्ट ट्रस्टने ऑडिट करून ही भिंत दुरुस्त करावी, जेणेकरून भविष्यकाळात मोठे संकट उद्भवणार नाही, असे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.

टॅग्स :तौत्के चक्रीवादळ