Join us
Daily Top 2Weekly Top 5

टाटा इंडिका, इंडिगोचे उत्पादन एप्रिलपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:36 IST

14.69 लाख इंडिका आणि 8.5 लाख इंडिगोची टाटाने आतापर्यंत विक्री केली आहे.

मुंबई : टाटा मोटार्सने इंडिका व इंडिगो या लोकप्रिय गाड्यांचे उत्पादन एप्रिलपासून बंद केले. नवीन तंत्रज्ञानाच्या गाड्यांवर ‘फोकस’ करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतल्याचे आॅटो क्षेत्राचे म्हणणे आहे.टाटा मोटार्सने १९९८ मध्ये इंडिका ही ‘हॅचबॅक’ श्रेणीतील गाडी बाजारात आणली, तेव्हा तो चर्चेचा विषय होता. इंडिकाच्याच ‘सेडान’ श्रेणीतील ‘इंडिगो’ मॉडेललाही ग्राहकांनी मोठी पसंती दिली होती. सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सच्या (सिआम) आकडेवारीनुसार कंपनीने २०१७-१८ या आर्थिक वर्षात १.८७ लाख वाहनांचे उत्पादन केले. आधीच्या आर्थिक वर्षापेक्षा त्यात २२ टक्के वाढ झाली. पण त्यामध्ये इंडिका व इंडिगोच्या उत्पादनाचा आकडा अनुक्रमे २,८५३ आणि १,७५६ होता. या दोन्ही गाड्यांच्या उत्पादनात मोठी घट झाल्यानंतर त्याचे उत्पादनच थांबविण्यात आले आहे.नेक्स्टजेनवर भरफेब्रुवारी महिन्यात ग्रेटर नॉयडा येथे झालेल्या आॅटो एक्स्पोमध्ये टाटा मोटार्सने अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नेक्सॉन, हेक्सा व टिअ‍ॅगो या गाड्यांच्या पुढील आवृत्त्या लॉन्च केल्या. येत्या काळात कंपनी या गाड्यांवरच लक्ष केंद्रित करणार असून त्यासाठीच इंडिका, इंडिगोचे उत्पादन बंद करण्यात आल्याचे आॅटो क्षेत्राचे म्हणणे आहे. 

टॅग्स :वाहनकार