तासगावकर कॉलेजची बिले थकीत
By Admin | Updated: February 6, 2015 22:51 IST2015-02-06T22:51:53+5:302015-02-06T22:51:53+5:30
कर्जत तालुक्यातील बहुचर्चित सरस्वती शिक्षण संस्थेच्या तासगावकर शिक्षण समूहातील दोन्ही कॉलेजमधील महावितरणची बिले थकली आहेत.

तासगावकर कॉलेजची बिले थकीत
नेरळ : कर्जत तालुक्यातील बहुचर्चित सरस्वती शिक्षण संस्थेच्या तासगावकर शिक्षण समूहातील दोन्ही कॉलेजमधील महावितरणची बिले थकली आहेत. परिणामी, वीज पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही महावितरण कंपनीने केल्याने दोन्ही ठिकाणी असलेली १० केंद्रे पूर्णत: अंधारात गेली आहेत. निवासी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अंधारकोठडीत दिवस ढकलावे लागत असून वीजबिलाची थकीत रक्कम तीस लाखांच्या घरात आहे.
पैशाची चणचण असतानाही सरस्वती शिक्षण संस्थेने दोन्ही ठिकाणची कॉलेज प्रचंड झगमगाट करून दीपवून टाकली होती, मात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्गाचा पगार न दिल्याने तासगावकर कॉलेजमधील खरी स्थिती कर्मचारीवर्गाच्या उपोषणाच्या माध्यमातून बाहेर आली. कामगार उपोषण करीत असताना तिकडे प्राध्यापकवर्गही पगाराच्या प्रतिक्षेत असल्याने थेट मुंबई विद्यापीठाला हस्तक्षेप करावा लागत आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे तासगावकर यांची चांदई आणि डिकसळ येथील कॉलेजेस अंधारात गेली आहेत. महावितरण कंपनीचे तीस लाखांचे वीज बिल थकल्याने दोन्ही ठिकाणी असलेल्या तब्बल १० अभियांत्रिकी आणि फार्मसी या विभागाच्या कॉलेजमध्ये अंधार पसरला आहे.
चांदई येथील कॉलेज परिसराचे सोळा लाखांचे तर डिकसळ येथील कॉलेजचे चौदा लाखांचे बिल थकले आहे, त्यानंतर महावितरण कंपनीने दोन्ही ठिकाणचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्याचा परिणाम म्हणजे चांदई येथील कॉलेज परिसरात असलेल्या निवासगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अंधारात राहावे लागत आहे.
पाणी मिळावे म्हणून कॉलेज प्रशासन दोन तास जनरेटरवर सुरू ठेवत असल्याची माहिती मिळाली आहे, पण विद्यार्थ्यांना रात्र अंधारात काढावी लागते. त्यावर कॉलेज प्रशासन मूग गिळून गप्प बसले आहे. आज कामगारांच्या उपोषणाचा ३१ वा दिवस आहे. (वार्ताहर)
४राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने तासगावकर कॉलेजला स्पष्ट शब्दात ताकीद देत शनिवारपासून कॉलेज सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विभागाचे संचालक डॉ. सुभाष महाजन यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला ही माहिती कळविली आहे. सरस्वती शिक्षण संस्थेने १० रोजी कॉलेज सुरू केले नाही तर, येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा मागील सेमिस्टरचा निकाल पाहून हे शैक्षणिक वर्ष फुकट जाऊ नये म्हणून अन्य कॉलेजमध्ये शिफ्ट करायचे का? याचा निर्णय घेतला जाणार आहे. कॉलेज गेल्या ८ जानेवारी रोजी सुरू होणे आवश्यक होते, मात्र ते या थकीत पगाराच्या कारणास्तव आजपर्यंत बंद आहे.