Join us

शहरे लक्ष्य, उपनगरांकडे दुर्लक्ष; मुंबई शहरात विकासाचा वर्षाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 12:28 IST

शहर भागावर प्रस्ताविक विकासकामांचा वर्षाव, तर दुसऱ्या बाजूला उपनगरे कोरडी ठाक अशी स्थिती आहे. याशिवाय दोघांच्याही घोषणा समानच आहेत. 

मुंबई-

पालकमंत्री म्हणून मंगलप्रभात लोढा आणि दीपक केसरकर यांनी मुंबई पालिकेच्या कारभारात लक्ष घालण्यास सुरुवात केली खरी परंतु या दोघांचेही जास्त लक्ष उपनगरांपेक्षा शहरी भागांकडे असल्याचे या दोघांनीही केलेल्या घोषणांवर नजर टाकली असता लक्षात येते. त्यामुळे शहर भागावर प्रस्ताविक विकासकामांचा वर्षाव, तर दुसऱ्या बाजूला उपनगरे कोरडी ठाक अशी स्थिती आहे. याशिवाय दोघांच्याही घोषणा समानच आहेत. 

लोढा हे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तर केसरकर यांच्याकडे शहर भागाची जबाबदारी अधिक आहे. सगळ्यात आधी लोढा यांची पालिकेत एन्ट्री झाली. त्यांनी लगोलग काही योजनांच्या घोषणा केल्या तसेच पालिका प्रशासनाचे काही निर्णय बदलण्यास सांगितले. शाडूच्या मातीवर टॅग लावण्याचा निर्णय त्यांनी रद्द करायला लावला. मलबार हिल जलाशयाबाबतही त्यांनी काही सूचना केल्या. 

पालिकेत चर्चेला उधाण१. विकासकामांसंदर्भातील या दोघांच्याही सूचना प्रामुख्याने शहर भागातील आहेत. त्यांच्या पोतडीतून उपनगरांसाठी काही योजना असल्याचे अजून तरी दिसलेले नाही. त्यामुळे शहर भागात विकासकामांची जंत्री, तर उपनगरे कोरडी ठाक अशी स्थिती आहे. 

२. पूर्व आणि पश्चिम या दोन्ही उपनगरांत पालिकेच्या नियोजित प्रकल्पांशिवाय अन्य कोणत्याही विकासकामांची घोषणा झालेली नाही. त्यामुळे उपनगरांच्या विकासाचा या दोघांनाही विसर पडला की काय? अशी चर्चा पालिकेत सुरू झाली आहे. 

या प्रश्नांवर लक्ष देण्यास सुरुवात मलबार हिल, बाणगंगा पुनरुज्जीवन प्रकल्प, महालक्ष्मी मंदिरासाठी रस्ता अशा विषयांसाठी त्यांनी बैठका घेतल्या. लोढा यांच्यानंतर केसरकर यांनीही पालिकेच्या कारभारात लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्यांनी मुंबादेवी, महालक्ष्मी, बाणगंगा, फॅशन स्ट्रीट परिसर विकास, कोळीवाड्यात पर्यटकांसाठी स्वतंत्र खोली, स्कायवॉकना सरकते जीने आणि लिफ्ट अशा प्रश्नांवर लक्ष. 

या विकासकामांना दिले प्राधान्य - लंडन आयच्या धर्तीवर वांद्रे येथे मुंबई आय, रेसकोर्स ते सागरी किनारा मार्गाला जोडणारा बोगदा, मुंबादेवी, महालक्ष्मी, बाणगंगा, फॅशन स्ट्रीट परिसराचा विकास, कोळीवाड्यात पर्यटकांसाठी स्वतंत्र खोली. 

- स्कायवॉकना सरकते जिने, फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र जागा, मंदिर दर्शनासाठी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी बॅटरीवर चालणारी वाहने, बाणगंगा तलावाजवळ पार्किंग सुविधा, आसन व्यवस्था, शास्त्रीय संगीत, अल्पोपहाराची सोय, कोळीवाड्यात फूड कोर्ट. 

- राणी बागेत लहान मुलांसाठी छोटी डबल डेकर, हेरिटेज इमारतींचे संवर्धन, हाजीअली परिसराचे सुशोभीकरण.

टॅग्स :मुंबई